क्रिकेटमधील टीमवर्क संस्कारातून पोपटराव पवार यशस्वी झाले

सचिन तेंडुलकर ः फाउंडेशनच्या वतीने राज्यातील दोन दुष्काळी गावे घेतली दत्तक
नगर – पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट संघातून पोपटराव पवार यांनी राष्ट्रीय स्तरावर आंतरविद्यापीठ स्पर्धा गाजविल्या. क्रिकेट खेळात संघटन कौशल्य (टीमवर्क) आणि नियोजन लागतं ते पोपटरावांनी आत्मसात केलं होत. त्याचमुळे ते ग्रामविकासात यशस्वी झाले. हिवरे बाजार सारखे आदर्शगाव व एकसंघ गाव ते घडवू शकले. खेळातून निर्माण झालेली आंतरिक उर्जा खेळाडूला स्वस्थ बसू देत नाही. ही उर्जा काहीतरी जगावेगळ असं चांगलं काम करण्याची प्रेरणा देते. या प्रेरणेतून पोपटरावांनी ग्रामविकासाचे काम हाती घेतले. आपली जन्मभूमी असणा-या हिवरे बाजाराला जलसमृद्ध करून गावाचा कायाकल्प घडविला. आता ते आदर्शगाव योजनेद्वारे इतर गावांचा कायापालट करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाचा आम्हा सर्व क्रिकेटपटूनां आदर व अभिमान वाटतो असे प्रामाणिक मत क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी मुंबईत पवार यांच्याशी झालेल्या भेटीत व्यक्त केले.
सचिन तेंडूलकर यांनी पोपटराव पवार यांना चहापानासाठी आपल्या निवासस्थानी 25 ऑक्‍टोबरला निमंत्रित केले होते. त्यांचे बरोबर त्यांचे पुणेविद्यापीठ क्रिकेट संघातील जुने मित्र व क्रीडा समिक्षक सुनंदन लेले होते. सचिन तेंडुलकर सोशल फौंडेशनच्या वतीने राज्यातील दोन दुष्काळी गावे दत्तक घेतली आहेत. त्यापैकी डोंजे या गावाला पोपटराव पवार यांनी भेट देवून मार्गदर्शन केले आहे.याबद्दल तेंडुलकर यांनी पवार यांचे आभार मानले.
या भेटीत 2 तास क्रिकेट व ग्रामविकासाबाबत त्यांनी चर्चा केली. 2 जून रोजी डॉ.अंजलीताई तेंडुलकर यांनी हिवरे बाजारला भेट दिली होती. त्याचा उल्लेख करून सचिन तेंडुलकर म्हणाले स्वच्छ, सुंदर व हिरवेगार हिवरे बाजार पाहून अंजली खूप प्रभावित झाली. आपल्या हिवरे बाजार भेटीचा सर्व वृत्तांत मला सांगितला. मलाही हिवरे बाजार पाहायचं आहे वेळ मिळाला की मी जरूर हिवरे बाजारला भेट देईल असा मनोदय व्यक्त केला. सचिन तेंडुलकर पुढे म्हणाले खेळातून संघर्ष व आत्मविश्‍वास निर्माण होतो. त्याचा चांगला उपयोग पोपटराव पवारांना झाला. एक क्रिकेट खेळाडू ग्रामविकासात कसं शाश्‍वत परिवर्तन आणू शकतो याच पोपटराव पवार एक उत्तम उदाहरण आहे. क्रिकेट मधून निवृत्त झाल्यावर स्वस्थ न बसता क्रिकेटपटूनी काहीतरी चांगल काम उभारणीच्या कामाला लागून देशसेवा करावी. त्यासाठी पोपटराव पवारांकडून धोरण घ्यावे. सामाजिक व ग्रामविकासाचे कामात त्यांनी आम्हास मार्गदर्शन केले या शब्दात त्यांनी पोपटराव पवार यांच्या कामाचा गौरव केला. तसेच शाल व श्रीफळ देवून सचिन तेंडुलकरांनी त्यांचा सत्कार केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)