क्रिकेटच्या तीनही प्रकारात कोहली पहिल्या पाचमध्ये

दुबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने क्रिकेटच्या तीनही प्रकारातील आयसीसी क्रमवारीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. कोहलीसह न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन देखील क्रिकेटच्या तीनही प्रकारात पहिल्या पाच खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-20 क्रमवारी जाहीर केली.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत शानदार कामगिरी करून विल्यम्सनने पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. विल्यम्सनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने बांगलादेशला 3-0 अशा फरकाने क्‍लीन स्वीप दिली. यामध्ये विल्यम्सनने तीन सामन्यांत मिळून दोन अर्धशतकांसह 145 धावा ठोकल्या. त्याचा लाभ त्याला क्रमवारी सुधारण्यासाठी झाला. विल्यम्सनने आधीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान निश्‍चित केले आहे.
दरम्यान विल्यम्सन व्यतिरिक्त फलंदाजीत कोहली क्रिकेटच्या तीनही प्रकारात सध्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आहे. टी-20 क्रिकेट क्रमवारीत कोहली अग्रस्थानी असून एकदिवसीय आणि कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. योगायोगाने कोहली आणि विल्यम्सन या दोघांनी अंडर-19 विश्‍वचषक स्पर्धेत 2008 मध्ये आपापल्या देशाचे नेतृत्व केले आहे. त्यावेळी भारतीय संघाने अंतिम फेरीत डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करून विजेतेपद मिळवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)