क्रांतीसिंह नाना पाटील चौक ठरतोय मृत्यूचा सापळा

शहराबाहेरुन वाहतूक वळविण्याची फलटणकरांची मागणी
अजय माळवे
फलटण, दि. 10 – फलटण शहरात असणारा क्रांतीसिंह नाना पाटील चौक हा दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे मृत्यूचा सापळा ठरु लागला आहे. त्यामुळे नव्याने रिंगरोडची निर्मिती करुन शहरातून सुरु असलेली वाहतूक शहराबाहेरुन वळविण्यात यावी अशी मागणी समस्त फलटणकरांमधून होत आहे.
फलटण शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. या चौकात सातत्याने वाहतूक ठप्प होत असून नागरिकांतून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहे. कोंडीचा नागरिकांना विशेषत: शालेय विद्यार्थी, महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या चौकात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या चौकातून जाणारी वाहतूक शहराबाहेरून रिंग रोड काढून वळविण्याची मागणी होत आहे.
येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून पुणे-पंढरपूर तसेच नगर – सांगली हे महामार्ग जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून पंढरपूर, शिखर शिगणापूर, जेजुरी, तुळजापूर गाणगापूर, अक्कलकोट, गोंदावले, म्हसवड, शिर्डीसह इतर तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या चौकालगतच फलटण एसटी बसस्थानक असल्यामुळे एसटी वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या साखर कारखाने सुरू झाले असून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील सहा ते सात साखर कारखान्यांसाठी होणारी ऊसाची वाहतूकही याच चौकातून जात असल्यामुळे फलटणचा हा चौक वाहतूक कोंडीचे आगारच ठरत आहे.
फलटण शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या, शहरामध्ये वाढत असलेले व्यवसाय, वाहनांची वाढती संख्या पहाता ही वाहतूक फलटण शहराबाहेरून रिंग रोड काढून वळवण्याची आवश्‍यकता आहे. या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने लक्ष घालून या चौकातील वाहतूकीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पोलीस प्रशासनाचा नियोजनशुन्य कारभार
क्रांतीसिह नाना पाटील चौक हा वाहतूक कोंडीचे आगार ठरत आहे. बेशिस्त आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे या चौकातील अपघातांचे प्रमाणाही वाढले आहे. मात्र, या चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना झाल्याचे आजवरतरी पहावयास मिळाले नसल्याने फलटणमध्ये पोलीस प्रशासनाचा कारभार हा नियोजनशुन्यच असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.
अतिक्रमणांचा अडसर
फलटण शहरातील महत्वाचा समजल्या जाणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटील चौकात अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. रस्त्याकडेलाच दुकाने, टपऱ्या थाटल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी थांबणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने पार्क करत असल्याने याचा वाहतुकीला अडसर ठरत आहेत. आधीच वाहनांची वाढलेली वर्दळ त्यात व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे पालिका आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)