कौशल्य विकासला जा अन्यथा गुणपत्रिका मिळणार नाही

विभागीय बोर्डाची सक्‍तीची “शाळा’: दहावीच्या विद्यार्थ्यांची अडवणूक

श्रध्दा कोळेकर

प्रभात विशेष
पुणे – इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत दोन विषयांपेक्षा अधिक विषयांत नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कौशल्य सेतू अभियाने अर्ज भरुन घ्या त्याशिवाय त्यांना दहावीच्या मूळ गुणपत्रिका देऊ नका असा फतवा दुसरे तिसरे होणी नाही तर चक्‍क पुणे विभागीय शिक्षण मंडळाने काढला आहे. मुख्य म्हणजे विभागीय मंडळाने काढलेल्या या पत्रात राज्याच्या पत्राचा संदर्भ असल्याने अशा प्रकारे राज्यभर विद्यार्थ्यांचे निकाल अडविण्याचे प्रकार आता करणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दहावीच्या नियमित परीक्षेत नापास झालेला आणि त्यानंतर पुरवणी परीक्षेतही दोन पेक्षा अधिक विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विभागीय मंडळाच्या सचिवांनी याबाबतचा आदेश काढला आहे. याबाबत त्यांनी एक पत्र काढले असून त्यात नमूद केल्याप्रमाणे या जुलै 2017 च्या फेरपरीक्षेत दोन पेक्षा अधिक विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना निकालासोबत कौशल्य सेतू अभियानाचे अर्ज वाटा. हे अर्ज माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे 9 सप्टेंबरपर्यंत जमा करा. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका देऊ नका.

दरम्यान याबाबत काही शिक्षक नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, दहावी नंतर विद्यार्थ्यांची गळती होऊ नये म्हणून शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्यामुळेच ते अर्ज भरुन घेतले जात असावेत. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अडविणे हे चुकीचे आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही दहावीची परीक्षा देण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे कौशल्य विकासचे अर्ज भरुन त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचा हा प्रकार मानला जावू शकतो. किमान शिक्षण विभागाने तरी अशी कोणतीही सक्‍ती विद्यार्थ्यांना करता कामा नये.

याबाबत बोलाताना माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी के.एन.चौधरी म्हणाले, कौशल्य सेतू अभियांतर्गत साधारण 17 ते 18 कोर्सेस चालविले जातात. ज्यामध्ये मोबाईल रिपेअरिंग सारख्या कोर्सेसचा समावेश आहे. दहावीच्या नियमित परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 1800 विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतला होता तर फेरपरीक्षेनंतर आताही अनेक विद्यार्थी यासाठी प्रवेश घेतील. आम्ही विद्यार्थ्यांची ही माहिती काही एजन्सीजना कळवतो त्यानंतर त्या एजन्सी या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना या कोर्सेसची मोफत माहिती देतात.

 

हे पत्र केवळ पुणे विभागीय मंडळाने काढलेले नाही हे शासनाच्या आलेल्या पत्रानुसार काढले आहे. मात्र विद्यार्थी म्हणून आमच्या निकालाची अडवणूक करणे बरोबर नाही, अशा आशयाची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नाही. यात आमचा हेतू अडवणूक करण्याचा नसून विद्यार्थ्यांना दिशा दाखविण्याचा आहे.
बी.के.दहिफळे, सचिव
पुणे विभागीय शिक्षण मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)