कौतुकास्पद! यासाठी वधू-वराने घेतला आठवा फेरा…

वाशिम – लग्नात वधू-वराचे सात फेरे असतात. मात्र एका लग्नात वधु-वराने आठ फेरे घेतले. तुम्ही म्हणाल आठवा फेरा कशाचा. तो आठवा फेरा होता बेटी बचाओ बेटी पढाओचा.

जिल्ह्यात मुलींची संख्या राज्यपातळीवर सर्वात कमी आहे. हा कलंक पुसण्यासाठी, जनजागृतीसाठी मंगरुळपीर येथील एका लग्न समारंभात वधू-वराला बेटी बचाओ बेटी पढाओ चा आठवा फेरा देऊन उपस्थितांनीही शपथ देण्याचा उपक्रम पार पाडला.

जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील सहकार भवन येथे स्वप्नील कतोरे व स्नेहा कतोरे यांचा दि. 18 एप्रिल रोजी विवाह झाला. याप्रसंगी या समारंभात नवदाम्पत्याने बेटी बचाओ बेटी पढाओचा आठवा फेरा घेवून समाजासमोर आदर्श ठेवला.
यावेळी डॉ. दिपक ढोके यांनी वधू-वरासोबत उपस्थित सर्व पाहुणे मंडळींसह बेटी बचाओ बेटी पढाओ चा संकल्प केला. यावेळी डॉ. ढोके समवेत निलेश सोमाणी, अभियानाच्या विशेष निमंत्रित डॉ. सरोज बाहेती, बालरोग तज्ञ डॉ. हरिष बाहेती, वधुवरांचे आईवडील उपस्थित होते.

यावेळी नवदाम्पत्यांना या अभियानांतर्गत सन्मान व शपथपत्र देण्यात आले. या अभियानाचे संयोजक व आयुष विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिपक ढोके व तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी आहेत.

लग्न समारंभात वधू-वराने बेटी बचाओ बेटी पढाओचा आठवा फेरा घेवून या अभियानाला हातभार लावावा असे, आवाहन यावेळी करण्यात आले. आजही स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणात होत असताना अशिक्षितांप्रमाणे सुशिक्षितांमध्येही हे प्रमाण वाढत आहे. यामुळे या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)