कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार तर कधी ?

 इमारतीचे उदघाटन होऊन दहा महिने उलटले


अद्याप पार्किंग सुरूच नाही

 

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयकुमार कुलकर्णी
पुणे- कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन होऊन तब्बल दहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरीही अद्याप तेथील पार्किंग सुरू झालेले नाही. त्याचा परिणाम शिवाजीनगर न्यायालयातील पार्किंगवर झाला आहे. कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्‍टीस करणारे वकील, पक्षकार शिवाजीनगर न्यायालयात गाडी पार्क करतात. त्यामुळे तेथे वाहनांची गर्दी होत आहे. कौटुंबिक न्यायालयाचे बांधकाम पूर्ण होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागला. आता तयार असलेले पार्किंग सुरू होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन 12 ऑगस्ट 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते झाले. कौटुंबिक न्यायालयाच्या मालकीची असलेली ही राज्यातील पहिलीच इमारत. या इमारतीच्या उदघाटनाच्या वेळी पार्किंग आणि शिवाजीनगर न्यायालय ते कौटुंबिक न्यायालयाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उदघाटन होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. नंतरच्या काळात “पे अँड पार्किंग’ सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, पुणे जिल्ह्यात कोणत्याही न्यायालयात पार्किंगसाठी शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे येथे पार्किंग शुल्क मोजण्यास वकील आणि संघटनांनी विरोध केला. याबाबत उच्च न्यायालयाला कळविण्यात आले. त्यानंतर पुणे जिल्हा बार असोसिएशनने यात लक्ष घालून भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणी केली. प्रसंगी आंदोलन करण्याची तयारी दर्शविली होती. दरम्यान 2018 सुरूवातीला चांगली बातमी आली. पहिल्याच आठवड्यात दोन्ही न्यायालयांना जोडणारा भुयारी मार्ग सुरू केला. प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत भुयारी मार्गाचे उदघाटन झाले. त्या कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग लवकरच सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यालाही आता तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. अद्याप कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू झालेले नाही. त्यामुळे वकील, पक्षकारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यानच्या काळात झालेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशन, बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणूकांमध्ये हा प्रश्‍न पाठीमागे पडला. आता संघटना संघटनामध्ये वाद निर्माण झाला आहे. कौटुंबिक न्यायालयातही दोन संघटना झाल्या आहेत. दरम्यान दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे शिष्टमंडळ कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू व्हावे, यासाठी उच्च न्यायालयात गेले होते. त्यावेळी “पे अँड पार्किंग’ शिवाय पार्किंग सुरू होणे शक्‍य नसल्याचे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यावेळी “पे अँड पार्किंग’ सुरू करण्यास दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिशनने सहमती दर्शवली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता तर लवकर कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू होईल का, हा प्रश्‍न असाच अधांतरी राहिल, अशी चर्चा न्यायालयीन घटकांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)