कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचे शनिवारी उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजूळा चेल्लूर यांची उपस्थिती
तब्बल 9 वर्षानंतर झाले इमारतीचे बांधकाम पूर्ण
कौटुंबिक न्यायालयाच्या मालकीची राज्यातील पहिलीच इमारत
पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) – तब्बल नऊ वर्षानंतर बांधकाम पूर्ण झालेल्या आणि राज्यात कौटुंबिक न्यायालयाच्या मालकीच्या असलेल्या पहिल्या इमारतीचे उदघाटन उद्या (शनिवार दि. 12 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजूळा चेल्लूर, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश शैलजा सावंत, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर, पालकमंत्री गिरीश बापट, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेंद्र दौंडकर आणि द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. गणेश कवडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होणार आहे.
शिवाजीनगर न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर या इमारतीचे भूमिपूजन 2009 मध्ये झाले होते. या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल 15 कोटी 49 लाख रुपये खर्चून ही अद्यावत इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ताब्यावर पालकांमध्ये दावा सुरू असलेल्या मुलांना बसण्यासाठी संकुल, पाळणाघर, प्रतिक्षालय, टी.व्ही., सुसज्ज ग्रंथालय, मानसोपचार तज्ज्ञ, बाल मानसोपचार तज्ज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. न्यायालयीन कक्षाची रचना देखील विशिष्ट पध्दतीने करण्यात आली आहे. ज्यामध्ये शारीरीकदृष्टया विकलांग पक्षकारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या नूतन इमारतीमध्ये न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असे भूमीगत वाहनतळ बांधण्यात आलेले आहे.

चौकट
खंडपीठाच्या घोषणेची वकिलांना आशा
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे सुरू होण्याबाबतचा प्रस्ताव विधी मंडळात मंजुर होऊन तब्बल 39 वर्षे उलटली आहेत. तरीही अद्याप येथे खंडपीठ सुरू झालेले नाही. मागील काही वर्षात वकील, सामान्य नागरिकांकडून खंडपीठाच्या मागणीचा जोर वाढला आहे. उद्याच्या कार्यक्रमात खंडपीठ मंजूर करण्याचा अधिकार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजूळा चेल्लूर उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात पुणे बार असोसिएशन आणि द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षांना जाहिरपणे खंडपीठाविषयी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही अनपेक्षितपणे या कार्यक्रमात खंडपीठाची घोषणा होईल, अशी वकिलांना आशा आहे. खंडपीठ आता नाही, तर पुन्हा कधी नाही, अशी कुजबूज दिवसभर वकिलांमध्ये होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)