कौटुंबिक न्यायालयाचे पार्किंग अखेर सुरू होणार

इमारत उद्‌घाटनानंतर 14 महिन्यांनी मिळाला मुहुर्त : “पे अँड पार्किंग’ तत्त्वावर होणार सुरू

पुणे – कौटुंबिक न्यायालयाच्या मालकीच्या असलेल्या राज्यातील पहिल्या इमारतीच्या उद्‌घाटनानंतर तब्बल 14 महिन्यांच्या कालावधीनंतर कौटुंबिक न्यायालयाचे पार्किंग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबचे पत्र उच्च न्यायालयाने दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनला पाठविले आहे. “पे अँड पार्किंग’ तत्त्वावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत हे पार्किंग सुरू राहणार आहे.

-Ads-

सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून पार्किंगचे दर निश्‍चित करण्यात येणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून पार्किंग सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष ऍड. प्रगती पाटील यांनी सांगितले. त्यावेळी माजी अध्यक्ष ऍड. गणेश कवडे उपस्थित होते. दैनिक “प्रभात’ने याबाबतचे वृत्त मंगळवारी (दि.9) प्रसिद्ध केले होते.

शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोर कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन 12 ऑगस्ट 2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे पार्किंग आणि कौटुंबिक न्यायालय ते शिवाजीनगर न्यायालयाला जोडणारा भुयारी मार्ग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाली नाही. नंतरच्या काळात कौटुंबिक न्यायालयात “पे अँड पार्किंग’ सुरू करण्याचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मात्र, पुणे जिल्ह्यात कोणत्याही न्यायालयात पार्किंगसाठी शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे येथे शुल्क मोजण्यास वकिलांनी नकार दिला. त्याबाबत उच्च न्यायालयात कळविण्यात आले. त्यानंतर पुणे जिल्हा बार असोसिएशनने त्यामध्ये लक्ष घालून भुयारी मार्ग, पार्किंग सुरू करण्याची मागणी केली. त्यावेळी जानेवारी 2018 च्या पहिल्या आठवड्यात भुयारी मार्ग सुरू करण्यात आला. तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते भुयारी मार्गाचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर तब्बल दहा महिन्यांनंतर कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरू होणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

“पे ऍन्ड पार्किंग’ तत्त्वाशिवाय पार्किंग सुरू होणार नसल्याचे उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावेळी सुरू होणारच नसेल तर “पे अँड पार्किंग’ तत्त्वावर पार्किंग सुरू करण्याची तयारी दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनने दाखवली होती. त्यास उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. त्यानुसार हे पार्किंग दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनला चालविण्यास देण्यात आले आहे. कंत्राट न देता स्वत: कामगार नेमून सुरू करण्याच्या अट घालण्यात आली आहे. व्यवस्थापनासाठी किती खर्च अपेक्षित आहे, त्यासाठी पार्किंगला चारचाकी आणि दुचाकी गाडीला किती शुल्क आकारायचे हे ठरविण्यात येणार आहे. येथे सुमारे 35 चारचाकी आणि सुमारे 200 दुचाकी पार्किंग करण्याची क्षमता आहे. आर्थिकदृष्ट्या पीडित असलेल्या महिलांना येथे देखरेखीच्या कामावर ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)