कोहली यांच्या खात्यावरील 33 हजार लंपास

कोणताही नंबर दिला नसताना पैसे काढल्याने आश्‍चर्य अन्‌ धक्‍का
लोणी काळभोर  -निःशुल्क रूग्णसेवा करणाऱ्या समाजसेवकाने आपला आधारकार्ड किंवा एटीएम कार्डचा नंबर दिला नसतानाही त्याचे बॅंकखात्यातून 33 हजार 995 रूपये काढण्यात आल्याची घटना घडल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
याप्रकरणी विनोदकुमार श्रीबनारसीदास कोहली (रा. श्रीप्रयागधाम ट्रस्ट आश्रम, उरूळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोहली हे या आश्रमामध्ये सुमारे पाच वर्षापासून येथील रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची निःशुल्क सेवा करतात. ते श्री प्रयागधाम आश्रमाचे कामांसाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास ऊरूळी कांचन येथील एसएमएस फर्निचर या दुकानात गेले.
दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका पुरूषाने संपर्क साधला. त्याने मी भारतीय स्टेट बॅंकेमधून बोलत आहे. आपले एटीएम कार्ड ब्लॉक होणार असून ते पूर्ववत चालू ठेवण्यासाठी मला आपल्या आधार व एटीएम कार्डचा नंबर द्या, असे सांगितले. यावर कोहली यांनी माझे आधार व एटीएम कार्डचा नंबर मी बॅंकेत दिला आहे. तुम्ही तेथून घ्या, असे सांगून मोबाईल बंद केला. त्यानंतर सुमारे 10 ते 15 मिनिटांनी त्यांना मोबाईलवर 5 संदेश आले. त्यांत त्यांचे बॅंक खात्यातून रक्कम काढली असल्याचे त्यांचे निदर्शनात आले. याची खातरजमा करण्यासाठी कोहली हे एसबीआय बॅंकेच्या ऊरूळी कांचन शाखेत गेले असता त्यांच्या खात्यातून 33 हजार 995 रूपये काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)