नवी दिल्ली: इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे. मात्र कर्णधार विराट कोहली या संघात सहभागी झालेला नाही. कोहलीचे वर्षभरातील व्यस्त वेळापत्रक पाहता त्याला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला व त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली. कोहलीला विश्रांती देण्याच्या निर्णयावर निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

कोहलीला अशा मोठ्या स्पर्धेमध्ये विश्रांती देण्याची गरज नव्हती. त्याला विश्रांती देणे इतकेच गरजेचे होते, तर आशिया चषक स्पर्धेनंतर होणाऱ्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत तसे करता आले असते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. निवड समितीचा माजी अध्यक्ष आणि माजी कसोटीपटूही असल्याने खेळाडूंवरील भार कमी करण्याकरिता त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे हे मला माहीत आहे. पण जेव्हा भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्‍न येतो, तेव्हा कोट्यवधी नागरिकांच्या भावना त्याच्याशी संबंधित असतात.

पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यातून कोहली बाजूला राहू शकला असता. पाकिस्तानचा समावेश असलेल्या स्पर्धेत कोहलीला आराम देण्याचा विचार न समजणारा आहे, असे सांगून पाटील म्हणाले की, भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचल्यास एकूण तीन भारत व पाकिस्तान सामने होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना कसे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)