कोविंद यांच्या विरोधात डाव्यांची मोर्चेबांधणी

नवी दिल्ली, दि. 20 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायला हवी. कारण ही विचारांची लढाई आहे, असे डाव्या पक्षांचे नेते डी. राजा यांनी म्हटले आहे. भाजपाने काल राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे बहुतेक राजकीय नेत्यांना आश्‍चर्य वाटते आहे. कोविंद हे दलित समाजातील असल्यामुळे त्यांच्या नावाला विरोध दर्शवने बहुतेक विरोधी पक्षांना अवघड बनले आहे. मात्र तरिही कोविंद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आणि भाजपाच्या दलित मोर्च्याशी संबंधित असल्याने त्यांना विरोध व्हायला हवा, अशी भूमिका डाव्या पक्षांनी मांडली आहे.
माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्यासारख्या नेत्यांना पाठिंबा द्यायला डावे पक्ष तयार आहे. मात्र उमेदवाराची अधिकृत घोषणा कॉंग्रेसने करायला हवी असे राजा यांनी सांगितले. या संदर्भात विरोधकांची 22 जून रोजी बैठक होणार असून त्यावेळी उमेदवाराच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा होईल, असेही राजा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)