कोल्हापूर , सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उग्र आंदोलन

-सांगलीतील साखर कारखान्यांचे कार्यालय पेटवले
-कोल्हापुरातील जवाहर साखर आणि दत्त सहकारी कारखान्याच्या कार्यालयाची केली तोडफोड

कोल्हापूर  – FRP ची पूर्ण रक्कम जमा न होता उसाची पहिली उचल २३०० रुपये जमा झाल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली आणि कोल्हापुरात आंदोलन तीव्र केले आहे. सांगली जिल्ह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील ऑफिस काही अज्ञातांनी शनिवारी पेटवून दिले तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे गेट केन ऑफिस पेटवून दिले.तर कोल्हापुरातीळ शिरोळ ,जयसिंगपूर आणि कुरुंदवाड इथं जवाहर साखर आणि दत्त सहकारी कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुदधा करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यालयच बंद करण्याचा धडाका सुरू केला आहे. साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्याप एकाही साखर कारखान्यांनी एफआरपी जमा केली नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या एफआरपीत मोडतोड केल्यास तीव्र आंदोलन करू असा गर्भित इशारा दिला होता.सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २३००रुपये वर्ग केल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे, याचाच परिणाम म्हणून आज सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गेटकेन आफिस कार्यकर्त्यांनी पेटवून दिले.

ऊस दरासाठी दोन महिन्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोनल सुरु केले. तब्बल दहा दिवस आंदोलन पेटत राहिले. त्यानंतर कारखानदार, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर साखर कारखाने सुरळीत सुरु राहिले. उसाची पहिली प्रतिटन २३०० रुपयांची उचल शेतकऱ्यांना खात्यावर जमा केली. ही उचल एफआरपी प्रमाणे एकरकमी जमा करण्यात आलेली नाही. केवळ ८० टक्के रक्कम जमा केली आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे कारखानदारांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याप्रमाणे आंदोलन सुरु केले आहे.

कुंडलच्या क्रांती कारखान्याचे घोगाव येथे विभागीय कार्यालय आहे.शुक्रवारी मध्यरात्री या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी हल्ला करुन ते पेटवून दिले. कार्यालयातील महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. कृष्णा कारखान्याचे रेठरेहरणाक्ष येथील कार्यालयही पेटवून दिले. यामधील टेबल, खुर्चा जळाल्या आहेत. कागदपत्रे टेबल ठेऊन जाळण्यात आली आहेत.शनिवारी सकाळी कर्मचारी कार्यालय उघडण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे पलूस व इस्लामपूर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची स्वच्छता करुन काम सुरु केले आहे. स्वाभिमानीने सुरु केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यात पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुरुंदवाडमध्ये कारखाना कार्यालयास ठोकले टाळे
उसाची पहिली उचल केवळ २३००रुपयेच जमा केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र केले असून कुरूंदवाड येथील साखर कारखान्याच्या गेटकेन कार्यालयास स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शनिवारी टाळे ठोकले.साखर कारखान्यांनी पहिली उचल २३००रुपये दिल्याच्या निषेधार्थ संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कुरुंदवाडमधील सर्वच साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी आंदोलक कार्यकर्ते आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वादावादी झाल्यामुळे काहीकाळ त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)