कोल्हापूर सत्र न्यायालयाचा डी.एस. कुलकर्णींना दिलासा

पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडीत रवानगी

कोल्हापूर- कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी डी.एस कुलकर्णींना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मात्र, कोल्हापूर सत्र न्यायालयाने आज त्यांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पुणे न्यायालयाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आज कोल्हापुरात झालेल्या 19 कोटी 57 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी डीएसके त्यांच्या पत्नी हेमांगी, मुलगा शिरीष यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करुन 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.

पण यावेळी डीएसकेच्या वकिलांनी डी.एस. के. तपासाला पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले. त्यांची सर्व कागदपत्रे तपास यंत्रणेकडे आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात वेगळा तपास करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. डी.एस. के 17 फेब्रुवारी 2018 पासून अटकेत आहेत. मुंबई पोलीस असतील आणि ईडीने येरवडा कारागृहात येऊन त्यांची चौकशी केली आहे. त्यामुळे यासाठी स्वतंत्र कोठडीची गरज नाही. शिवाय चौकशीसाठी कोल्हापूर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग न्यायालयाच्या परवानगीने येरवडा कारागृहात येऊन चौकशी करु शकतात, असाही युक्तिवाद डीएसकेच्या वकिलांनी केला आहे.

हा युक्तिवाद सरकारी वकिलांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने डीएसकेंच्या कोठडीची मागणी फेटाळून त्यांना पुन्हा पुणे न्यायालयाच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे डीएसकेंना दिलासा मिळाला असून फॉरेन्स्कीक ऑडिट रिपोर्ट आल्यानंतरच जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. या रिपोर्टमधून डीएसकेना मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)