कोल्हापूर विभागात महावितरणने १२ हजार वीज बिल कनेक्शन तोडली

कोल्हापूर – वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोल्हापूर परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 12 हजार 418 थकबाकीदारांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी  खंडित करण्यात आला आहे. दरम्यान आर्थिक वर्षाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने व त्यात दोन दिवस सुटी आल्याने गुरुवारी (दि. 29) व शुक्रवारी (दि. 30) सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकीचा भरणा करण्यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.

थकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेली ही मोहीम सुटीच्या दिवशी सुद्धा सुरु राहणार आहे. या मोहिमेत प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे व मुख्य अभियंता श्री. किशोर परदेशी यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो वीज कर्मचारी सहभागी झाले आहेत.चालू महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात  घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 7 हजार 428 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 1 कोटी 79 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला. तर सांगलीत 4990 वीजग्राहकांकडे 85 लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

थकबाकीमुळे तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यास थकबाकीच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क (रिकनेक्शन चार्जेस) भरणे नियमानुसार आवश्यक असून त्यानंतरच संबंधीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल. नियमानुसार लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी 50 रुपये तर थ्री फेज कनेक्शनसाठी 100 रुपये तर उच्चदाब वीजग्राहकांसाठी 500 रुपये पुनर्जोडणी शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सोय उपलब्ध नसल्याने थकबाकीदारांनी थकीत रक्कम व पुनर्जोडणी शुल्क भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून कोल्हापूर परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्र दि. 29 व 30 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. तसेच घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही  वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)