कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार; 12 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर – जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद 5056 घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी 22 फुटांपर्यंत पोहोचली असून, विविध नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली.

गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गगनबावडा तालुक्‍यात अतिवृष्टी झाली आहे. शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा तालुक्‍यांत जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 161.10 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून कडवी, कासारी, कोदे या धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक पाऊस कोदे धरणक्षेत्रात मिलिमीटर झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे.

राधानगरी धरणाचे मंगळवारी दुपारी क्रमांक 3 व 6 हे स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, सांडव्यासह एकूण विसर्ग प्रतिसेकंद 3,628 घनफूट सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. तुळशीतून 756, वारणातून 1571, दूधगंगेतून 525 घनफूट असा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच राहण्याची शक्‍यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत दीड फुटाने वाढ झाली असून, तब्बल बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

गणेशोत्सवाच्या धामधुमीतच जोरदार पाऊस कोसळत असल्याने तरुण मंडळांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात घरगुती गणेश विसर्जनाच्या अगोदर दोन दिवस सजीव देखावे सादर केले जातात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पावसामुळे मंडळांची गोची झाली आहे.

मंगळवारी दुपारपर्यतचा धरणांतून होणारा विसर्ग असा (क्‍यूसेक मध्ये)

राधानगरी- 5056, तुळशी- 756, वारणा- 1571, दुधगंगा – 525, कासारी -1352, कडवी -186, कुंभी-1250, जंगमहट्टी-140, घटप्रभा- 1625, जांबरे-156, कोदे ल.पा- 310

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)