कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणार

विधानसभेत विधेयक संमत : पुजाऱ्यांमध्ये 50 टक्‍के महिला पुजाऱ्यांचा समावेश होणार
मुंबई – पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात बुधवारी विधानसभेत एकमताने विधेयक मंजूर करण्यात आले. या पगारी पुजाऱ्यांमध्ये 50 टक्‍के महिला पुजारीही असणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी करवीरवासियांनी केली होती. यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलनही झाले होते. मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधानसभा विधेयक क्रमांक 33 “श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर कोल्हापूर हे विधेयक संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत मांडले होते. बुधवारी त्यावर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले.

पंढरपूर येथे रूक्‍मिणीमातेची पूजा महिला पुजाऱ्यांकडून केली जाते. अंबाबाई देखील मातृदेवता असल्याने तिचीही पूजा महिला पुजाऱ्यांकडून करण्यात यावी. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी पूजाविधी स्कूलची स्थापना केली होती. या शाळेतून पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. पुजाऱ्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज नाही, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील जमिनीबाबत मी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची एसआयटी चौकशीही घोषित केली होती. त्याचे काय झाले असा प्रश्नही क्षीरसागर यांनी विचारला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्व हिंदूंच्या मंदिरांमध्ये पुजारी नेमताना काही अटी शर्ती ठेवाव्यात व परीक्षा घेऊन त्यांची नेमणूक करण्यात यावी व सर्व जातींच्या व्यक्‍तींना पुजारी होण्याची मुभा असावी अशी सूचना केली.

मंदिर विश्वस्तव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी “श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत एकूण आठ सदस्य असतील. कोल्हापूर महापालिकेचे महापौर हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनींसंदर्भात फॉरेन्सिक ऑडिट पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल लवकरच सभागृहात सादर करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)