कोल्हापुरात दोन अपघातात पुण्यातील 19 ठार

कोल्हापूर – कोल्हापूरला 26 जानेवारी हा दिवस घातवार ठरला आहे. गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या आणि दर्शन घेऊन परत येणाऱ्या पुणे येथील भाविकांच्या वाहनांवर शुक्रवारी काळाने घाला घातला. या दोन्ही अपघातात वाहनांचा ताबा सुटुन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात तब्बल 19 जण ठार झाले. तर पाच जण गंभीर जखमी झाले.

तळवडे तालुका शाहुवाडी येथे सकाळी पावणे अकराच्या सुमारास झाडाला धडकुन झालेल्या भीषण अपघातात दोन कुटुंबातील पाच आणि चालक असे सहा जण ठार झाले. यामध्ये एकाच कुटुंबातील माय-लेकी गंभीर जखमी झाल्या. तर रात्री पावणे बाराच्या सुमारास ब्रिटिशकालिन शिवाजी पुलाचा कठडा तोडुन 17 आसनी मिनी बस थेट पंचगंगा नदीत कोसळल्याने बालेवाडी, पिरंगुट येथील 13 जण ठार झाले.मृतामध्ये नवसाच्या सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश असल्याचे समजते. यामध्ये तीन महिला जखमी असुन, त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रजासत्ताक दिन आणि सलग सुट्टयांच्या पाश्वभुमीवर कोकण सहल तसेच देवदर्शनासाठी पुणे येथील वेगवेगळ्या ठिकाणाहुन हे भाविक कोल्हापूरातुन निघाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस असलेले संतोषकुमार राऊत व दिपक शेळके हे त्यांच्या कुटुंबियांसह प्रशांत पाटणकर यांच्या चारचाकी वाहनातुन रत्नागिरी येथील गणपुतीपुळे दर्शनासाठी निघाले होते. सकाळी पावणे अकराच्या सुमारास तळवडे (ता. शाहुवाडी, जि.कोल्हापूर) येथील एका वळणावर वाहनाच्या भरधाव वेगावर नियंत्रण न राहिल्याने चालकाचा ताबा सुटुन गाडी रस्त्याच्या डाव्या बाजुला झाडावर आदळली.

-Ads-

हि धडक इतकी जोरदार होती की वाहनातील संतोषकुमार त्रिंबक राऊत (37), स्नेहल ऊर्फ अपर्णा संतोष राऊत (32, सर्व रा. शेवाळेवाडी, हडपसर, पुणे) आणि दिपक बुधाजी शेळवंदे (40, रा. साई पार्क, दिघी, पुणे) तिघेजण जागीच ठार झाले. गंभीर जखमी स्वानंद संतोष राऊत (5) आणि प्रणव दिपक शेळवंदे (2) या दोन बालकांचा मलकापूर ग्रामीण रुग्णालयात मृत्यु झाला. तर अपघातातील गंभीर जखमी चालक प्रशांत पाटणकर यांच्यासह वरुणा दिपक शेळवंदे (40) आणि यज्ञा दिपक शेळवंदे (3) यांना छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालु असतानाच दुपारी पाटणकर यांचाही मृत्यु झाला.

अपघाताची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली असुन, चालक व मयत प्रशांत पाटणकर यांच्याविरोधात भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवुन इतरांच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असुन, जखमी मायलेकींवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पुण्याच्या बालेवाडी आणि पिरंगुटे परिसरात राहणारे भरत केदारी, संतोष वरखडे, दिनेश नांगरे यांचे कुटुंबिय 26 जानेवारी निमित्ताने सलग सुट्ट्या लागल्याने कोकण पर्यटनासाठी 17 सीटर मिनी ट्रॅव्हलरमधून निघाले होते. या कुटुंबियांनी गणपतीपुळे इथून देव दर्शन आटोपून कोल्हापूरला यायला निघाले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मिनी ट्रॅव्हल्स पुलाचा दगडी कठडा तोडून वरून थेट 100 फूट खोल असणाऱ्या पंचगंगा नदीच्या पात्रात कोसळली.
गाडी कोसळल्याचा आवाज एकूण त्याच परिसरातील तरुणांनी बचावकार्य सुरू केले. ही माहिती आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर पोलीस, फायरब्रिगेड तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्‍यू ऑपरेशन सुरू केले. सुरुवातीला पाण्यात बुडालेल्या गाडीतील 7 जणांना काढण्यात यश आले. परंतु तासभर प्रयत्न करून देखील मिनी बस गाळातच रुतून बसलेल्यामुळे गाडीतील इतर प्रवाशांना बाहेर काढता आले नाही.
अखेर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त मिनी बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आणि गाडीतील उर्वरित 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकूण गाडीत 16 प्रवासी होते. यातील 13 मृतदेह काढण्यात आलेत, तर तिघा जखमींनावर सीपीआर रुग्णालायात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर पोलीस, फायरब्रिगेड, समाजसेवी संस्था आणि कोल्हापुरातील तरुणांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे 4 तास रेस्क्‍यू ऑपरेशन केले. अपघात झाल्याचे समजताच पंचगंगा नदी घाटावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी भेट देऊन पाहणी केली.

मृत व्यक्तींची नावे
संतोष बबनराव वरखडे (45),
गौरी संतोष वरखडे (16),
ज्ञानेश्वरी संतोष वरखडे (14),
सचिन भरत केदारी (34),
निलम सचिन केदारी (28),
संस्कृती सचिन केदारी (8),
सानिध्य सचिन केदारी (9),
साहिल दिलीप केदारी (14),
भावना दिलीप केदारी (35) ,
श्रावनी दिलीप केदारी (11),
छाया दिनेश नांगरे (41),
प्रतिक दिनेश नांगरे (14),
मृतामध्ये वाहन चालकाचाही समावेश आहे. मात्र वाहन चालकाचे नाव समजू शकले नाही.

जखमी व्यक्तींची नावे अशी
प्राजक्ता दिनेश नागरे (18),
मनिषा संतोष वरखडे (38),
मंदा भरत केदारी.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीच्या पाण्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत देण्यात येणार आसल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जखमींची भेट घेऊन विचारपूस करत मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून मिनी ट्रॅव्हल्स 100 फूट खोल पंचगंगा नदीच्या पाण्यात कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जण मृत झाले आहेत. सर्व मृतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत करण्यात येणार आहे. तर अपघातातील जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवसाच्या पोरासह कुटुंबही संपले
बालेवाडी येथील केदारी कुटुंबातील बारा जण भरत केदार यांच्या सानिध्य या नऊ महिन्याच्या मुलाच्या जन्माचा नवस व देवदर्शन निमित्त बहिण छाया नांगरे आणि मनिषा वरखडे यांचे कुटुंब असे सर्वजण या वाहनातुन गणपतीपुळे येथुन देवदर्शनन झाल्यानंतर कोल्हापूर येथे करवीर निवासिनी श्री.अंबाबाई देवीचे दर्शन आणि मुक्कामासाठी आले होते.पण यातील तेरा जणांवर सर्वांवर काळाने घाला घातला.ज्या नवसा च्या पोरासाठी हे सर्वजण आले होते.त्या सानिध्यासह त्याचे कुटुंबियही यामध्ये संपले.सकाळी आठच्या सुमारास शेवटचा मृतदेह या मुलाचा उदयसिंह निंबाळकर यांनी काढला.यावेळी पाहणाछयांचेही मन गहिवरुन गेले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)