कोल्हापुरात क्रेनचा रोप तुटून 3 मजूर ठार

सांगवडेवाडीत विहिरीत गाळ काढताना घडली दुर्घटना; एक जण गंभीर जखमी
कोल्हापूर (प्रतिनिधी)- सांगवडेवाडी (ता. करवीर) येथे विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू असताना क्रेनचा रोप तुटून यारी अंगावर कोसळल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली.
रामचंद्र साळवी, भैरूलाल माळी (सध्या रा. पट्टणकोडोली, मूळ – राजस्थान) आणि बाबूराव वडार (रा. सांगवडेवाडी) अशी मृत पावलेल्या मजुरांची नावे आहेत. तर शिवाजी पवार हा कामगार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली.
सांगवडेवाडी येथे संजय पाटील यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी विहिरीत उतरलेल्या काही कामगारांकडून गाळ उपसून क्रेनच्या ट्रॉलीत भरण्याचे काम सुरू होते. भरलेली ट्रॉली क्रेनवरून पाठविली जात असताना अचानक क्रेनच्या यारीचा दोर तुटला आणि विहिरीत काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर ही यारी कोसळली. त्यामुळे रामचंद्र साळवी, भैरूलाल माळी आणि बाबूराव वडार हे तिघेही जागीच ठार झाले. तर शिवाजी पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंचनामाही करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)