कोल्हापुरात उद्या पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा

हिंदू सणांच्या दडपशाहीविरोधात निघणार मोर्चा – शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा इशारा

कोल्हापूर – हिंदूंच्या पारंपरिक सणांबाबत दडपशाहीचे धोरण अवलंबणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात 30 ऑगस्ट रोजी पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पोवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून हिंदूंच्या धार्मिक सणावर अनेक निर्बंध लादले जात आहेत. कायद्याचा, नियमांचा धाक दाखवून बैठकांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना धमक्‍या दिल्या जात आहेत. गुन्हे दाखल करून तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचा पोलीस प्रशासन नवीन खेळ करत आहे. परंतु कोल्हापुरातील मटका, जुगार आदी अवैध व्यवसाय बंद होत नाहीत. खुनाचे आरोपी सापडत नाहीत. पैशाचे बक्षीस लावून खुन्याचा शोध पोलीस करत आहेत. मग पोलीस यंत्रणा काय कामाची असा सवालही या वेळी उपस्थित केला.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भय पथकांची स्थापना करण्यात आली. पण ही पथक काय करतात याचाही शोध घेतला पाहिजे. जिल्ह्यात खाजगी सावकारकी जोरात सुरू आहे. यातूनच अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली हौस पूर्ण करण्यासाठी महागड्या सायकली खरेदी केल्या. याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे. पोलिसांच्या धोरणाविरोधात विरोधात उद्या बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार तर गुरुवारी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी बिंदू चौकात संध्याकाळी पाचच्या सुमारास महाआरती करणार, असे संजय पोवार म्हणाले. हिंदू सणांवर कायद्याचा आधार घेऊन बंधने घालणार असाल तर आम्ही सडेतोड उत्तर देऊ असा इशारा यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला. या वेळी दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)