कोलकाताचे मुंबईसमोर 108 धावांचे आव्हान

आयपीएल-10 क्रिकेट स्पर्धा क्‍वालिफायर-2 लढतीत गोलंदाजांचे वर्चस्व

बंगळुरू – गोलंदाजांनी वर्चस्व गाजविलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव 18.5 षटकांत सर्वबाद 107 धावांवर रोखून मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल-10 क्रिकेट स्पर्धेतील क्‍वालिफायर-2 लढतीवर पकड घेतली. पावसाचे सावट असलेल्या या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार हे स्पष्ट होते. मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या गोलंदाजांनी सिद्ध केले.

फिरकी गोलंदाज कर्ण शर्माने आपल्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविताना केवळ 16 धावांत कोलकाताचे सुनील नारायण, गौतम गंभीर, कॉलिन ग्रॅंडहोम व ईशांक जग्गी हे चार खंदे फलंदाज तंबूत परतविले. त्यात गौतम गंभीर व ग्रॅंडहोम यांना एकाच षटकात बाद करण्याच्या कामगिरीचाही समावेश होता. जसप्रीत बुमराहने केवळ 7 धावांत ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि सूर्यकुमार यादव या अव्वल फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविला. मिशेल मॅकक्‍लॅनेघनच्या जागी संघात आलेल्या मिशेल जॉन्सनने 28 धावांत पियुष चावला आणि नॅथन कूल्टर नाईल यांना बाद केले, तर मलिंगाने अंकित राजपूतचा त्रिफळा उडवून कोलकाताचा डाव गुंडाळला.
त्याआधी आजच्या लढतीसाठी कोलकाता संघ पुन्हा एकदा सुनील नारायणला सलामीला पाठविण्याचा धोका पत्करणार की नाही, असा सर्वांनाच प्रश्‍न होता. कारण मुंबईविरुद्ध गेल्या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. परंतु कोलकाताने हा धोका पत्करला आणि तो जुगार अपयशी ठरल्याचेच त्यांना पाहावे लागले. बुमराहने ख्रिस लिन (4) व रॉबिन उथप्पा (1) यांना परतविले, तर कर्ण शर्माने सुनील नारायण (10), गौतम गंभीर (12) आणि ग्रॅंडहोम (0) यांना बाद करून कोलकाताची 5 बाद 31 अशी घसरगुंडी घडवून आणली.
अशा बिकट वेळी ईशांक जग्गी आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी जमली. या दोगांनी मुंबईच्या गोलंदाजांना निर्धाराने तोंड देत सहाव्या विकेटसाठी 7.5 षटकांत 56 धावांची झुंजार भागीदारी करीत कोलकाताला किमांन सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. अखेर कर्ण शर्माने ईशांकला बाद करून ही जोडी फोडली. ईशांकने 31 चेंडूंत 3 चौकारांसह 28 धावा केल्या. त्यानंतर कोलकाताचा डाव पुन्हा घसरला.
जॉन्सनने चावला व कूल्टर नाईल यांना बाद केल्यावर बुमराहने सूर्यकुमार यादवला बाद करीत कोलकाताचा शेवट नजीक आणला. तर मलिंगाने राजपूतला बाद करीत कोलकाताचा डाव संपुष्टात आणला. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 31 धावा केल्या.

तत्पूर्वी आजच्या निर्णायक सामन्यासाठी दुखापतग्रस्त मिशेल मॅकक्‍लॅनेघनच्या जागी मिशेल जॉन्सनचा समावेश करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्स संघाने घेतला. तर युसूफ पठाणच्या जागी अंकित राजपूतचा समावेश करून कोलकाताने धाडसी निर्णय घेतला. युसूफ पठाणला वगळले जाण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरली. निष्प्रभ ठरलेल्या ट्रेन्ट बोल्टच्या जागी कॉलिन ग्रॅंडहोमचा समावेश करून कोलकाताने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आणखी एकाची भर घातली.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाईट रायडर्स – 18.5 षटकांत सर्वबाद 107
(सूर्यकुमार यादव 31, ईशांक जग्गी 28, गौतम गंभीर 12, सुनील नारायण 10, गोलंदाजी- कर्ण शर्मा 16-4, जसप्रीत बुमराह 7-3, मिशेल जॉन्सन 28-2, लसिथ मलिंगा 24-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)