कोरेगाव भीमा ग्रामसभेत महिलांचा रुद्रावतार

कलाकेंद्र व दारू दुकानांच्या परवान्यावरून रंगली महिला ग्रामसभा

कोरगाव भीमा/शिक्रापूर-कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे महिलांच्या ग्रामसभेत नवीन दारु दुकाने तसेच कलाकेंद्राला विरोधाचा पवित्रा घेत महिलांनी दारु परवान्यावरुन पुन्हा एकदा रुद्रावतार धारण केला. दरम्यान सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनानेही याची गांभीर्याने दखल घेत गावातील दारुबंदीबाबतचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरेगाव भीमा येथे सरपंच संगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तर ग्रामसभा सुरू असतानाच गावातील कलाकेंद्रासाठी दोन तर परमिट रुम व बियर शॉपीच्या दुकांनासाठी आलेल्या 19 अर्जांवर चर्चा सुरू असताना सरपंच संगिता कांबळे व इतर सदस्यांनी मासिक सभेतच कलाकेंद्राचा अर्ज फेटाळला असल्याचे सांगत विरोध दर्शविला. तसेच यावेळी उपस्थित सर्व महिलांनीही विरोध दर्शविला. दरम्यान कोरेगाव भीमा परिसरात यापूर्वी सुरु असलेली सर्व परमिट रुम व बियरबार बंद करण्यात यावीत आणि त्याबरोबर गावातील अवैध गावठी दारू व मटका व्यवसाय देखील तातडीने बंद करण्यात यावा, असा ठराव मीना ढेरंगे यांनी मांडला. त्यावेळी लगेचच महिला ग्रामसभेला उपस्थित सर्व महिलांनीही हात वर करून दारुबंदीस पाठींबा दर्शविला. यावेळी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमन ढेरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्या मीना ढेरंगे, कृष्णाबाई गव्हाणे व भामाबाई गव्हाणे यांनी नवीन दुकानांना ग्रामसभेने परवानगी दिल्यास आंदोलनाचा इशारा देत गावात सुरू असलेली दारू दुकाने बंद करण्याबाबतचा ठराव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्याची मागणी केली. तेव्हा ही मागणी तत्काळ मान्य करीत याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सरपंच संगिता कांबळे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी सांगितले. या महिला ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेतील शेतकऱ्यांच्या यादीचे वाचन केले. त्यासदेखील ग्रामसभेने मंजुरी दिली. तसेच बाळोबा मंदिराचे प्रलंबित असलेले काम तात्काळ पूर्ण करण्याबाबतची मागणी शारदा कांबळे यांनी केली. तर यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शुद्ध पाणी प्रकल्पाचा त्याचप्रमाणे अनूसुचित जाती जमातीसाठी आरक्षित विकास निधीचाही हिशोब महिलांकडून विचारण्यात आला. त्यानंतर झालेल्या विशेष ग्रामसभेतही दारू दुकाने तसेच कलाकेंद्राला विरोधांचे ठराव मंजूर करण्यात आले. या सर्व घडामोडीनंतर दारू बंदीबाबत यापुढे नेमकी काय कार्यवाही होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
यावेळी सरपंच संगिता कांबळे, उपसरपंच मालन साळुंखे, जितेंद्र गव्हाणे, नितिन गव्हाणे, गणेश फडतरे, प्रकाश ढेरंगे, योगेश गव्हाणे पाटील, रमेश शिंदे, सुरेंद्र भांडवलकर, कल्पना गव्हाणे, वृषाली गव्हाणे, आशा काशिद, अंजली ढेरंगे, शारदा गव्हाणे, मनिषा आव्हाळे, पुजा भोकरे, कृष्णाबाई गव्हाणे, मंगला कुलकर्णी, मीना ढेरंगे, लत्ताबाई सव्वाशे, अस्मिता सव्वाशे, कमल गव्हाणे, भामाबाई गव्हाणे, सुमन ढेरंगे, मंजुळाबाई सासवडे आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी विषय वाचन केले. महिला ग्रामसभेला 283 उपस्थिती होती, तर यानंतर झालेल्या विशेष ग्रामसभेला 203 नागरिकांची उपस्थिती होती.

  • निराधार महिला व विधवा परितक्ता, अपंग या महिलाना संजय गांधी निराधार योजनेत लाभ मिळवून देण्यात येईल तसेच अंध, अपंग, मूकबधिर यांनीही आपले अर्ज जमा करावेत ग्रामपंचायत पाठपुरावा करून लाभ मिळवून देईल.
    -नीतिन गव्हाणे पाटील, माजी उपसरपंच कोरेगाव भीमा.
  • अवैध धंद्यांना परवानगी न देण्याचा ठराव
    प्रारंभी सरपंच संगीता गोविंद कांबळे यांनी हातात माइक घेऊन सांगितले की, माझाच या ठरावाला विरोध आहे. मी या पदावर असेपर्यंत एकही अशा व्यवसायाच्या ना हरकत पत्रावर सही करणार नाही. या त्यांच्या घोषणाने सभेचा नूरच पालटला. यानंतर ग्रामपंचायत सदस्या पुजा भोकरे यांनीही या पद्धतीने जाहीर पाठींबा दिला तर माजी उपसरपंच वृषाली गव्हाणे यांनी महिलांमध्ये बसूनच त्यांना पाठींबा दिला. यामुळे तणाव कमी होऊन खेळी मेळीच्या वातावरणात चर्चा झाली. बियरबार, परमिटरुम, बियरशॉपी, कलाकेंद्र, मटका व्यवसाय, अवैध अशा समाजातील त्रासदायक व्यवसायांना ग्रामसभा परवानगी देणार नाही, असा ठराव करून त्यास महिलांनी मंजुरी दिली.
  • चालू दुकानेही बंद करा
    कोरेगाव भीमा ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच परमिट रुम, बियर बार, बियरशॉपीची तब्बल 19 नवीन परमिटसाठी ना हरकत दाखला मागण्यात आले होते. महिलानी संघटीतपणे विरोध करून ठराव फेटाळून लावला. हा शक्‍य न वाटणारा विजय मिळविल्यानंतर चालू दुकानांचे काय हा प्रश्न पुढे आला. यावर दारुची चालू सर्व दुकाने व मटका व्यवसाय हे सर्व बंद करण्याचा ठराव केला. या ठरावाला सूचक मीना ढेरंगे होत्या, तर सुमन ढेरंगे यांनी अनुमोदन दिले. ठराव सर्वानुमते मंजुर झाला
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)