कोरेगाव भीमात एका कंपनीला अचानक आग

सुदैवाने जीवितहानी टळली
शिक्रापूर -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असेलल्या कल्याणी फोर्ज लिमिटेड या कंपनीतील हिट ट्रिटमेंट विभागातील भूमिगत असलेल्या ऑइलच्या टाकीने मंगळवारी सकाळी अचानक पेट घेतला. रांजणगाव येथील अग्निशामक दलाच्या जवानांना दोन तासाने आग विझविण्यात यश आले असून त्यामध्ये कंपनीचे नुकसान झाले आहे.
कोरेगाव भीमा येथे असलेल्या कल्याणी फोर्ज लिमिटेड या कंपनीमध्ये भूमिगत असलेल्या सीएफ 3 या भट्टीला आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी कंपनीतील कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आटोक्‍यात येत नव्हती. यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकाने रांजणगाव येथील अग्निशामक दलास माहिती दिली असता अग्निशामक दलाने तातडीने कोरेगाव भीमा येथे धाव घेत कंपनीला लागलेली आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुपारी दोनच्या सुमारास आग आटोक्‍यात आली. जवानांना आग विझविण्यात यश आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नसून कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान कितीचे झाले आहे याबाबत काहीही माहिती समजू शकली नाही. याबाबत कल्याणी फोर्ज लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापक राजेश शुक्‍ला (रा. सोपाननगर, वडगाव शेरी, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करीत आहेत.

  • कंपन्यांना झाली अग्निशामक बंबाची आठवण
    सणसवाडी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, पिंपळे जगताप, करंदी, तळेगाव ढमढेरे या ठिकाणी असंख्य कंपन्या असून कित्येकदा कंपन्यांना आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. या भागामध्ये आग लागल्यानंतर रांजणगाव गणपती अथवा पुणे येथून अग्निशामक बंब बोलवावे लागतात; परंतु पुणे नगर रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडी असल्यामुळे अग्निशामक बंबांना येथे पोहचण्यास वेळ लागतो. त्यामुळे कित्येकदा येथील कंपन्यांचे अग्निशामक बंब स्थापनेबाबत चर्चा झालेली आहे. मात्र त्यांनतर पुन्हा याकडे लक्ष दिले जात नाही. आज घडलेल्या या घटनेने पुन्हा सणसवाडीला अग्निशामक बंबाची आठवण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)