कोरेगावात मटका अड्ड्यावर छापा

रोख रकमेसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त
कोरेगाव, दि. 2 (प्रतिनिधी) – येथील बऱ्याच वर्षांपासून बिनधोकपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी टाकलेल्या छाप्यात नऊ मटका बुकींना अटक करण्यात आली. या कारवाईत रोख रकमेसह सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकजण अंधाराचा फायदा घेवून पसार झाला . तर जागा मालकावरही गुन्हा दाखल झाला असून तोही फरार आहे. यावर्षातील कोरगावात झालेली मटक्‍यावरील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव शहरातील आरफळ कॉलनी येथे एका घरात शहर व तालुक्‍यातील मटका घेणारे दहा मटका बुकी गोळा केलेली रक्कम मोजत असल्याची माहिती कोरेगावच्या पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे यांना मिळाली होती. त्यानुसार कट्टे यांनी विश्‍वासातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना बरोबर घेवून मटका बुकींच्या अड्ड्यावर रात्री उशिरा छापा टाकला. छापा टाकल्यावेळी दहा मटका बुकी पैसे मोजताना जागेवरच सापडले. मात्र, एक मटका बुकी अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला. या छाप्या प्रकरणी संबंधित जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शाहरुख हजरत काझी, रियाझ पीर महंमद काझी, अनिल रझ्झाक शेख, अरबाज अशफाक शेख, सलीम हजरत काझी, मंगेश हिंदुराव मदने, मनोज किसन पार्टे, सुनिल अनिल बोतालजी, राहुल किसन पार्टे या नऊजणांना अटक करण्यात आली. उमेश ननवरे व सतोष मल्हारी भंडलकर हे दोन संशयित आरोपी फरार आहेत. अटक आरोपींना आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

-Ads-

दरम्यान, या कारवाईमध्ये नऊ लाख 32 हजार 400 रुपये रोख रकमेसह 1 लाख 24 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकींसह 18 मोबाईल फोन्स असा सुमारे 12 लाख रुपये रक्कमेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गेल्या अनेक वर्षातील कोरेगावातील मटका अड्ड्यावर झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. पोलीस उप अधीक्षक कु. प्रेरणा कट्टे यांच्या या धडक कारवाईचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या कारवाईमध्ये रहिमतपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक व्ही. बी. जगदाळे, पो. ना. एस. बी. नाळे, पो.कॉ. महेश पवार, विनोद पवार यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी कट्टे यांचे अभिनंदन केले आहे.

चुडप्पांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

काल रात्री कोरेगावात झालेल्या मटका बुकींवरील कारवाईत मोठ्या रोख रकमेसह सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतू कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडप्पा यांना या कारवाईबद्दल सकाळपर्यंत काहीच माहिती नव्हती. दादासाहेब चुडप्पा यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर एलसीबी तसेच स्वत: पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी कोरेगावातील अवैध धंद्यांवर धडक कारवाया केलेल्या आहेत. त्यामुळे दादासाहेब चुडप्पा हे केवळ शो पीस आहेत, हे सिद्ध झाले आहे. हप्तेखोरीमुळे कोरेगाव पोलीस ठाण्याचे नाक या आठवड्यात झालेल्या दोन कारवायांमुळे कापले गेले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)