कोरेगावच्या आरोग्यासाठी आमदारांना घरपोच करा

सुनील खत्री : नऊ वर्षात प्रथमच त्यांना महिलांच्या आरोग्याची चिंता

कोरेगाव, दि. 8 (प्रतिनिधी) – गेली नऊ वर्षे तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचे रक्त शोषून घेणाऱ्या आमदारांना पहिल्यांदाच महिलांच्या आरोग्याची चिंता वाटू लागली आहे. आजपर्यंत मतदारसंघात कोणताही विकास न करता तालुक्‍याबरोबर कार्यकर्तेही कुपोषित केले आहेत. यापुढे तालुक्‍यासह लोकांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर या लोकप्रतिनिधींना घरपोच करायची वेळ आता आली असल्याचा टोला जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सुनील खत्री यांनी दिला.
तांदूळवाडी येथील कोरेगाव स्वाभिमान विचारमंचच्या आयोजित केलेल्या संमेलनात ते बोलत होते. सुनील खत्री म्हणाले, विद्यमान आमदारांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव तालुक्‍यात मतदारसंघातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी सुरू आहे. यामध्ये महिलांच्या कॅन्सर, रक्तशर्करा, कॅल्शियम, थायरॉइड, हिमोग्लोबिन आदी बाबींच्या मोफत तपासण्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुरू आहेत. गेल्या नऊ वर्षांत मतदारसंघातील महिलांच्या आरोग्याची तपासणी का झाली नाही? त्यावेळी महिलांना आरोग्य तपासणीची गरज नव्हती का? संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात महिलांच्या मोफत आरोग्य तपासण्या सुरू झाल्या आहेत. महिलांच्या आरोग्य तपासणी करताना कोरेगाव तालुक्‍यातील निष्ठावान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही आरोग्य तपासण्या विद्यमान आमदारांनी कराव्यात. लोकप्रतिनिधींच्या लहरी वागण्यामुळेच कोरेगाव मतदार संघातील कार्यकर्ता कुपोषित राहिला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांचे शोषण विद्यमान आमदारांनी वेळोवेळी केले आहे, अशी टीका खत्री यांनी आ. शिंदे यांचे नाव न घेता केली.
कार्यकर्ता तयार होण्यासाठी किमान वीस वर्षे सार्वजनिक जीवनात समाजकार्य करावे लागते. नऊ वर्षांपूर्वी घरचा की बाहेरचा असा भेदा-भेद न करता आम्ही विद्यमान लोकप्रतिनिधींना स्वीकारले. विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांची विकासाची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. तालुक्‍यात रोज नवीन खेळ खेळाला जात आहे. गावोगावचा निष्ठावान कार्यकर्ता मोडून काढायचा उद्योग गेल्या अनेक वर्षे कोरेगाव- खटाव तालुक्‍यात रोज लोकप्रतिनिधींच्या कडून सुरू आहे. गेली दोन निवडणुकीत आमदारांचे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आज कुठे आहेत? राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्ता संपवायचा आणि त्या जागी आपली हुजरेगिरी करणारा कार्यकर्ता तयार करायचा असे उद्योग कोरेगाव तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधीच्याकडून सध्या सुरू आहेच. आज तरुण पिढीला नोकरी व्यवसायाला न लावता तमाम तरुणाला राजकारणात ओढला जात आहे. त्यांना व्यसनाधीन करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम सध्या मतदारसंघात सुरू आहे. हे सर्व संपवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन खत्री यांनी केले.
बैठकीत कोरेगाव तालुक्‍यातील अनेक गावचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)