कोरेगावचा विकास सत्तापिपासू वृत्तीमुळे खुंटला

कोरेगाव तालुका ; राजकीय वार्तापत्र

धैर्यशील बर्गे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोरेगाव – राज्यातील अन्य तालुका मुख्यालयांप्रमाणे कोरेगावचा प्रामाणिक विकास व्हावा या हेतूने नागरिकांनी नेहमीच एकहाती सत्ता सोपवण्यात धन्यता मानली. अगदी ग्रामपंचायत असतानापासून आणि आता नगरपंचायतीच्या स्थापनेनंतरही हीच परंपरा कायम राहिली, मात्र सत्ता पिपासू व्यक्तींमुळे आणि धोरणांमुळे प्रत्येक पंचवार्षिकला अभद्र युतीचा पायंडा पडला आणि त्यातून अनेकांचे राजकारण बहरले, मात्र शहराचा विकास खुंटला. जिल्ह्यातील अन्य शहरांनी विकासाची शिखरे पादाक्रांत केली, मात्र कोरेगावच्या वाट्याला उपेक्षा आली.

कोरेगावचे सरपंचपद भूषविलेल्या दत्ताजीराव बर्गे यांनी तालुक्‍याचे आमदार म्हणून काम केले, मात्र ग्रामपंचायतीत कधीही हस्तक्षेप केला नाही. त्यानंतर आमदार झालेल्या शंकरराव घारगे, विश्‍वासराव माने, तुषार पवार, आनंदराव फाळके, शंकरराव जगताप, डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतीची जबाबदारी दिली. स्वतःचे निर्णय लादले नाहीत. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी हे गावपातळीवर आघाडी अथवा पॅनेलचा निर्णय घेत आणि सर्वसमावेशक उमेदवारी देत. कधीही पक्षीय पातळीवर निवडणूक न करता, आपआपल्या विचारांच्या पॅनेलद्वारे निवडणूक करण्याचा पायंडा पडला होता. परंतु, याला 1984 नंतर सत्ता पिपासू लोकांमुळे गालबोट लागले.

स्व. आ. दत्ताजीराव बर्गे यांच्या पॅनेलमधून जिंकलेल्या जगन्नाथ झांजुर्णे यांनी स्व. मुरलीआण्णा बर्गे यांना सरपंच करण्यास विरोध दर्शवून स्व. शिवाजीराव बर्गे यांच्या पॅनेलबरोबर युती करून सरपंचपद मिळवले. त्यानंतर कोरेगावच्या राजकारणाला चुकीचे वळण लागत गेले ते आजतागायत कायम आहे.

त्यांच्यानंतर बाळासाहेब बाचल, सौ. मंदा किशोर बर्गे व राहूल रघुनाथ बर्गे यांनी निवडून आलेल्या पॅनेलबरोबर न राहता, राजकीय जुळवाजुळव करत अनुक्रमे सरपंच आणि उपसरपंचपद भूषविले. ग्रामपंचायत असेपर्यंत कोरेगावचे राजकारण नेहमीच दोलायमान राहिले. विकासाची कामे बाजूला राहत, केवळ राजकारणच सुरु राहिले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात नगरपंचायतीची घोषणा झाल्याने पुन्हा एकदा राजकारणाचा बाजार मांडला गेला. 2014 मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार झालेल्या शशिकांत शिंदे यांनी नगरपंचायत निवडणुकीत व्यक्तीशः लक्ष घातले. त्यांच्या हट्टामुळे पक्षीय पातळीवर आणि चिन्हांवर निवडणूक लढवली गेली.

17 पैकी 9 जागा मिळवत राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली, तर कॉंग्रेसला 8 जागांवर समाधान मानावे लागले. शहराचा पहिला नगराध्यक्ष हा बर्गे कुटुंबियांमधूनच करावा, अशा मागणीने जोर धरल्याने प्रशांत उर्फ राजाभाऊ फत्तेसिंह बर्गे यांना नगराध्यक्षपदावर संधी देण्यात आली. त्यांना सात महिने आणि उरलेले 17 महिने अन्य व्यक्तीला नगराध्यक्ष करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला, मात्र पहिल्याच दिवसापासून 17 नगरसेवक एकत्रित आले आणि त्यांनी विकासाभिमूख निर्णय म्हणून एकोप्याने कामकाज केले. त्यानंतर हळूहळू विकासकामांवरुन वादंग झाले आणि एक-एक करत प्रत्येकजण बाजूला जाऊ लागला.

राजाभाऊ बर्गे यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगत पूर्ण कार्यकाल कामकाज करणार असल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादीत अंतर्गत कलह वाढत गेला. अडीच वर्षानंतर नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव असल्याने राजाभाऊंनी कॉंग्रेसच्या गोटात जाऊन हे पद स्वतःकडे ठेवले. त्यातून त्यांच्यात आणि आ. शशिकांत शिंदे यांच्यामध्ये राजकीय शत्रुत्व आले. दरम्यानच्या काळात नगराध्यक्षांनी काही नगरसेवकांना बरोबर घेत भाजपच्या नेतृत्वाशी बैठका घेतल्याने विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी भाजप सरकारने दिला आणि त्यातून कोरेगाव नगरपंचायतीत पुन्हा एकदा भुकंप झाला.

कॉंग्रेसला एक गट हा नगराध्यक्षाच्या बाजूने उभा राहिला तर दुसरा गट हा आ. शशिकांत शिंदे यांच्याबरोबर चर्चेद्वारे एकत्र बनू लागला. आ. जयकुमार गोरे यांनीही त्यामध्ये कृष्णाची भूमिका बजावत आपले जवळचे मित्र किरण बर्गे यांना आ. शिंदे यांच्याशी युती करण्यास भाग पाडले. त्यातून आता नगरपंचायतीत नगराध्यक्षांना बाजूला ठेवत राष्ट्रवादीचे 8 आणि कॉंग्रेसचे 4 नगरसेवक एकत्र आले. त्यांनी विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध करत नगराध्यक्षांच्या एकछत्री कारभाराला एकप्रकारे आव्हानच दिले. नगराध्यक्षपदाचा कार्यकाल आता काही महिन्यांवर येऊन संपुष्टात येत असल्याने संख्याबळाच्या आधारे दोन्ही कॉंग्रेस नगराध्यक्षांना अल्पमतात आणत आहेत. त्यातून प्रत्येकाचे सोईस्कर राजकारण होणार असले तरी विकासकामांना मात्र खिळ बसणार आहे, हे मात्र निश्‍चित.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)