कोरियन एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू 

प्रा. अविनाश कोल्हे 

उत्तर व दक्षिण कोरिया यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. मात्र, आता ते एकत्र येण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांच्या एकत्रीकरणात काही मूलभूत अडचणी आहेत. त्या समजून घेतल्याशिवाय आजचा प्रवास कसा व का अडचणीचा आहे, हे अजिबात समजणार नाही. 

राजकारणात काहीही अशक्‍य नाही. कालचे शत्रू आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसतात तर कालचे मित्र राष्ट्रं बघताबघता एकमेकांचे शत्रू होतात. सन 1950 पासून एकमेकांना सतत पाण्यात पाहणारे उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया एकत्र येत आहेत. कोरियाच्या समस्येचा उगम विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला. 1910 साली जपानी सम्राटांनी कोरिया गिळंकृत केला. जपानच्या ताब्यात कोरिया दुसरे महायुद्ध संपेपर्यंत होता. याच काळात कोरियात स्वातंत्र्य लढा जोरात होता. दिनांक 1 डिसेंबर 1943 रोजी कैरो येथे अमेरिका, चीन व इंग्लंड या तीन देशांची परिषद भरली होती व त्यात कोरियाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्‍त राष्ट्रसंघाने 1945 साली कोरियाच्या प्रशासनासाठी एक विश्‍वस्त मंडळ असावे अशी सूचना मांडली. याचा एक भाग म्हणजे कोरियाचे विभाजन. उत्तर कोरियाचे प्रशासन सोव्हिएत युनियनकडे तर दक्षिण कोरियाचे अमेरिकेकडे, अशी ही योजना होती. त्यानुसार 10 ऑगस्ट 1945 च्या रात्री बारा वाजता दोन्ही लष्करातील अधिकाऱ्यांनी “38 व्या समांतर रेषेला’ दोन कोरियातील सीमारेषा म्हणून मान्यता दिली. उत्तर कोरियातले जपानी सैन्य रशियाला शरण गेले तर दक्षिण कोरियातले जपानी सैन्य अमेरिकेला. ही तात्पुरती व्यवस्था होती. दुर्दैवाने तेव्हाच शीतयुद्ध सुरू झाले व ते कोरियाच्या एकत्रीकरणापर्यंत पोहोचले. सन 1948 मध्ये दोन्ही कोरियात वेगवेगळे सरकार स्थापन झाले. जून 1950 मध्ये उत्तर कोरियाच्या सैन्याने दक्षिण कोरियावर चढाई केली. हे युद्ध तब्बल तीन वर्षे चालले. यामुळे प्रश्‍न अधिकच चिघळला. सन 1953 मध्ये दोघांच्यात शस्त्रसंधी झाली. तेव्हापासून आजपर्यंत उत्तर कोरिया व दक्षिण कोरियाचे एकत्रीकरण झालेले नाही.

उत्तर कोरियाच्या मागे चीन तर दक्षिण कोरियाच्या मागे अमेरिकेचे सामर्थ्य होते. तेव्हा जगाच्या राजकारणात एका बाजूला सोव्हिएत युनियन, दुसरीकडे अमेरिका तर तिसरीकडे चीन असा त्रिकोण होता. हा त्रिकोण भेदण्याचे ऐतिहासिक कार्य अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्‍सन यांनी केले. त्यांनी हेन्‍री किसिंजर यांना पुढे करून अमेरिका-चीनची मैत्री घडवून आणली. तेव्हापासून कोरियाच्या एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली.
मात्र गेली काही वर्षे या दोन देशांत पुन्हा ताणतणाव निर्माण झाले आहेत. आज उत्तर कोरियाचे नेतृत्व किम जोंग उन यांच्याकडे आहे. त्यांनी अलीकडे अणुस्फोट व क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचा धुमधडाका उडवला होता. त्यांच्यात व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जाहीर बाचाबाची झाली होती. किम यांनी “मी अमेरिकेला उद्‌ध्वस्त करेन’ अशी धमकी दिली होती. मात्र, अगदी अलीकडे त्यांनी बरेच नरमाईचे धोरण स्वीकारले होते. एवढेच नव्हे तर पुढच्या महिन्यांत त्यांची व डोनाल्ड ट्रम्प यांची भेट ठरली आहे. या नरमाईचाच एक भाग म्हणून किम जोंग यांनी मागच्या महिन्यात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची गळाभेट घेतली. या शांतता भेटीची जगभर चर्चा झाली. जागतिक राजकारणाच अविचारी, हेकट, रागीट अशी प्रतिमा असलेल्या किम जोंग यांच्या कृतीचे सर्वांना आश्‍चर्य वाटत आहे. किम व मून यांच्या भेटीनंतरच्या पत्रकात कोरियन द्वीपकल्पात युद्ध न होऊ देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. तसेच आण्विक निःशस्त्रीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याचेही जाहीर केले आहे. हे सर्वच आश्‍वासक आहे.

दोन्ही देश शांतता प्रक्रियेबाबत गंभीर आहेत व ती यशस्वी व्हावी यासाठी मनापासून प्रयत्न करतील, असे आज तरी वाटते. मात्र, कोरियाच्या एकत्रीकरणात काही अतिशय महत्त्वाचे अडथळे आहेत. एक म्हणजे उत्तर कोरियात राजेशाही आहे. उत्तर कोरियाचे विद्यमान सर्वेसर्वा किम यांचे वडीलसुद्धा कोरियाचे प्रमुख होते. एकत्रीकरण झाले तर त्यांच्या घराण्याच्या हातात असलेली सत्ता जाईल. त्याला ते तयार होतील का? थोडक्‍यात उत्तर कोरियात हुकूमशाही आहे तर दक्षिण कोरियात लोकशाही शासन आहेत. अशा स्थितीत एकत्रीकरण अवघड आहे.

दक्षिण कोरियाच्या तुलनेत उत्तर कोरिया आर्थिकदृष्ट्या फार मागासलेला आहे. अशा स्थितीत एकत्रीकरण कसे होईल? दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाच्या दरात प्रचंड तफावत आहे. म्हणूनच कदाचित दक्षिण कोरियातील जनता, खास करून तेथील तरुण पिढी याबद्दल फारशी उत्साही नाही. दक्षिण कोरियात 1990 च्या दशकात एकत्रीकरणाबद्दल एक जनमत चाचणी घेतली होती. तेव्हा 80 टक्के जनतेने एकत्रीकरणाच्या बाजूने कौल दिला होता. अशीच चाचणी जेव्हा 2011 साली घेण्यात आली तेव्हा फक्‍त 56 टक्के लोकांनी अनुकूलता दाखवली. शिवाय दक्षिण कोरियातील तरूण पिढीला उत्तर कोरिया एक शत्रू राष्ट्र वाटते.

आज जशी कोरियाच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे तशीच चर्चा सन 2000 व 2007 साली झाली होती. मात्र तेव्हा हे प्रयत्न निष्फळ ठरले. आता किम यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियात होऊन होऊन किती बदल होतील, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. शिवाय कोरियाचे एकत्रीकरण अमेरिकेला कितपत मान्य आहे? हाही एक प्रश्‍न आहेच.
आजच्या पूर्व आशियाची स्थिती अशी आहे की, अमेरिकेचे जपानमध्ये सुमारे 40 हजार सैन्य आहे तर दक्षिण कोरियात सुमारे 30 हजार. हा सर्व लवाजमा उत्तर कोरिया व त्याद्वारे चीनची भीती यावर उभा आहे. जर कोरियन एकत्रीकरण शक्‍य झाले तर हे सर्व मोडून पडेल व अमेरिकेचे या भागातील लष्करी अस्तित्व संपुष्टात येईल. अमेरिकेच्या प्रशांत महासागरातील हितसंबंधांच्या दृष्टीने हे अमेरिकेला कितपत आवडेल? चीनला अमेरिकेचा दक्षिण कोरियातील हस्तक्षेप संपावा असे वाटते. पण जर कोरियाचे एकत्रीकरण झाले तर चीनचा उत्तर कोरियातील हस्तक्षेपाला काही समर्थन राहणार नाही. म्हणूनच चीनच्या दृष्टिकोनातून कोरियन एकत्रीकरण चिनी हितसंबंधांच्या विरोधात आहे. यातून काय निघेल हे आज कोणालाही ठामपणे सांगता येत नाही. मात्र किम यांचा दौरा ही एक सुरुवात आहे व भविष्यात अशा घटना घडण्याची शक्‍यता आहे हे नक्की. आता पुढच्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प व किम यांची सिंगापूरला भेट होणार आहे. पाहू या काय होते आहे ते!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)