कोरडगावच्या अवलियाबाबांचा आजपासून यात्रोत्सव

कोरडगाव- पाथर्डी तालुक्‍यातील कोरडगाव येथील हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या अवलियाबाबांचा यात्रोत्सव रविवारी (दि.25) सुरुवात होणार आहे. चैत्र महिन्यात श्रीरामनवमीच्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते.

यात्रेच्या दिवशी बाबांच्या कबरेला कावडीने आणलेल्या जलाने अभिषेक केला जातो. त्यामध्ये हिंदू-मुस्लीम धर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. कावडीची सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते.

अवलिया बाबांच्या जयघोषाने परिसर दणाणून जातो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी छबीना, संदलची मिरवणूक निघते. बाबांच्या नावाने सोडलेल्या घोड्याची सुंदर फुलांनी सजावट केली जाते. त्यावर बाबा स्वार होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. घोड्यासमोर उदाचा धूप करून त्यामागे मौलाना कुराणाचे पठण करतात. त्यांच्यामागे टाळमृदंगाच्या गजरात वारकरी दिंडीत सहभागी झालेले असतात. हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे अनोखे प्रतीक येथे पहायला मिळते.
याबाबत बाबांची अख्यायिका सांगितली जाते की, कोरडगावला एक अनोळखी इसम फकिराच्या वेशात आला. तो कोणत्या धर्माचा, जातीचा, कोठून आला हे अद्याप समजलेले नाही. पण त्याच्या वागण्याबोलण्यातून तो कोणी अवतार असावा, असा विश्‍वास लोकांमध्ये दृढ झाला. नंतर कोरडगावातच त्यांच्या मृत्यू झाला व त्यांची कबर येथे बांधण्यात आली. तेव्हापासून येथे यात्रोत्सवास सुरुवात झाली.
यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांच्या हगाम्याचे आयोजन केले जाते. त्यामध्ये जिल्ह्यासह राज्यभरातून नामवंत मल्ल हजेरी लावतात. तसेच लोकनाट्याचेही आयोजन केले जाते. बाबांचे भक्‍त हरिभाऊ बडे कोरडगावकर हे आपली कला बाबांच्या चरणी सादर करतात. विशेष म्हणजे येथे पशुहत्या केली जात नाही. सोमवारी (दि.26) होणाऱ्या कुस्ती हगाम्यासाठी राज्यातील महाराष्ट्र केसरी ठरलेले पहिलवान येणार असल्याची माहिती सरपंच विष्णूनाना देशमुख यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)