कोयना भागविणार दुष्काळी गावांची तहान

धरणात 76.37 टीएमसी पाणीसाठा; कर्नाटक राज्याकडून पाण्याची मागणी
सूर्यकांत पाटणकर

पाटण – महाराष्ट्र राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांची विजेची सिंचनाची तहान भागविणाऱ्या कोयना धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणात 76.37 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरण व्यवस्थापनाच्या यावर्षीच्या योग्य नियोजनामुळे पूर्वेकडील सिंचन व पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी कोणत्याही मर्यादा येणार नसल्या तरी कर्नाटक राज्याकडून अतिरिक्‍त होणारी पाण्याची मागणी व दुष्काळी गावांची तहान भागविण्यासाठी उर्वरित पाण्याचे काटेकोर नियोजन धरण व्यवस्थापनाला करावे लागणार आहे.

सुमारे 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातील 67.5 टीएमसी पाणी पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी वापरले जाते. तर पूर्वेकडील सिंचनासाठी 29 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येतो. चालू वर्षी पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी आजपर्यंत 26.94 एवढा पाणीसाठा हा वीजनिर्मितीसाठी वापरण्यात आला आहे. तर पायथा विजगृहातून 15.93 पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी करण्यात आला आहे.

पोफळी टप्पा एक व दोनमधून 520.340 दशलक्ष युनीट कोळकेवाडी वीजगृहातून 259.827 दशलक्ष युनीट व टप्पा क्रमांक चारमधून 421.420 दशलक्ष युनीट अशी वीज निर्मिती झाली आहे. गेल्या वर्षी 1429.794 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावर्षी पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी 40.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीजनिर्मिती व सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र शासनाने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावे जाहीर केली आहेत. त्या गावांसाठी व कर्नाटक राज्याने अतिरिक्‍त पाण्याची मागणी केल्यास धरण व्यवस्थापनाला गत वर्षीप्रमाणे तारेवरची कसरत करावी लागणार आहे.सध्या कोयना धरणात 76.37 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर गतवर्षी आज रोजी 83.58 एवढा पाणीसाठा शिल्लक होता.

कोयनाधरण व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार पश्‍चिमेकडील वीज निमिर्ती व पूर्वेकडील सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करण्यात येत आहे. मात्र पूर्वेकडील सिंचनासाठी अतिरिक्‍त पाण्याची मागणी केल्यास पश्‍चिमेकडील वीज निर्मितीसाठी लागणारा पाणीसाठा शिल्लक ठेवून पूर्वेकडे पायथा वीजगृहातून वीज निमिर्ती करुन पाणी सोडण्यात येते. त्यामुळे अतिरिक्‍त पाण्याची मागणी केल्यास त्याचा वीजनिमिर्तीवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र काही प्रमाणात सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची कमतरता तालुक्‍यातील नदीकाठच्या गावांना भासते.

यावर्षी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे. 1 जून ते 30 मे असे कोयना धरणाचे जलवर्ष असते. त्यामुळे अजून चार महिने विज निर्मितीसाठी व सिंचनासाठी आवश्‍यक असणारा पाणीसाठा कोयना धरणात शिल्लक आहे. त्यामुळे सध्या असणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यामुळे सिंचन विजनिर्मितीची चिंता मिटली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)