कोयना प्रकल्प देशाचे वैभव : आर. के. सिंग

कोयना धरण व्यवस्थापन देशपातळीवरील पुरस्कराने सन्मानित

कोयनानगर  – गेल्या सहा दशकापासून राज्यातील जनतेला तिमिरातून तेजाकडे नेणारा कोयना जलविद्युत प्रकल्प हा तेजोमय प्रकल्प आहे. हा प्रकल्प देशाचे वैभव असल्याचे गौरवोद्दगार केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंग यांनी काढले.
केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळ या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2018 सालचा उत्कृष्ट धरण व्यवस्थापनासाठीचा देशपातळीवरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

हा पुरस्कार राष्ट्रध्दारक व महाराष्ट्राची भाग्यरेखा असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणास व धरण व्यवस्थापनास देण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आर. आर. पवार, मुख्य अभियंता मंत्रालय नागेंद्र शिंदे, कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता कुमार पाटील आदी उपस्थित होते.

सहा दशकापूर्वी उभारलेले कोयना धरण एक असले तरी त्याचे फायदे अनेक आहेत. 105.25 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या कोयना धरणातील पाणी कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्याची तहान भागवत असून धरणामुळे निर्माण झालेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून सुमारे 2,000 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते. कोयनेची वीज ही राज्यातील उद्योग विश्‍वाच्या संवेदना जपण्याचे काम करते.

कोयना धरणातील पाण्यामुळे पूर्वेकडील 25 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली शेतीत हरितक्रांती झाली आहे. दुष्काळी तालुक्‍यासाठी कोयनेचे पाणी संकटमोचक ठरले आहे. पन्नास वर्षात धरणाची निगा उत्कृष्ट पध्दतीने राखून धरण व्यवस्थापनात असलेली सुसूत्रता लक्षात घेवूनच हा पुरस्कार देण्यात आला आहे.

राष्ट्रीय प्रकल्प जाहीर करण्याची मागणी
उत्कृष्ट धरण व्यवस्थापना साठीचा पुरस्कार कोयना धरणास प्रदान करण्यात आल्यामुळे ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. धरण व्यवस्थापनाचा गौरव हा कोयना पुत्राचा गौरव असून कोयना प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करावा अशी मागणी कोयनापुत्रांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)