कोयना धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करावे

आ. शंभूराज देसाई यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी सिंघल यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

काळगाव – पाटण तालुक्‍यातील 110 गावांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. धरणातील पाणी पूर्वेकडील भागाकडे व सांगली जिल्ह्याकडे जात असल्याने पाटण व कराड तालुक्‍यातील कोयना नदीपात्र कोरडे पडते. या दोन्ही तालुक्‍यासाठी कोयना धरणातील पाणी राखून ठेवण्याची मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी सिंघल यांनी कोयना धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांना बैठकीत दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आमदार देसाई यांच्यासह सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर, रोहयो उपजिल्हाधिकारी संजय पाटील, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटण आणि कराड तालुक्‍यातील कोयना नदीकाठचे जमीनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खासगी योजनांच्या माध्यमातून ओलिताखाली येत असते. पाटण तालुक्‍यातील कोयना धरणामध्ये गतवर्षीपेक्षा 12.297 टीएमसी ने पाणीसाठा कमी आहे. पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात सिंचनाकरीता पाण्याची मागणी होत असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत असून ते थेट सांगली जिल्ह्याकडे जाते. धरणातील पाणी जूनपर्यंत प्रथम प्राधान्याने पिण्याच्या वापराकरीता तसेच शेतामधील उभी पिके वाचविण्याकरीता राखून ठेवणे गरजेचे असल्याचे आ. शंभूराज देसाई यांनी सांगितले.

ते म्हणाले, शासनाने पाटणमधील 110 तर कराड तालुक्‍यातील 100 हून अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहिर केला आहे. कोयना धरणासह कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत विविध धरण प्रकल्पातील पाण्याची पातळी गतवर्षीपेक्षा घटलेली आहे. कोयना धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी आहे. दोन्ही तालुक्‍यातील कोयना नदीकाठचे जमिनक्षेत्र हे उपसा जलसिंचन योजना व खासगी योजनांच्या माध्यमातून ओलिताखाली येत आहे. धरणातील घटलेला पाणीसाठा लक्षात घेता या तालुक्‍यातील सर्व धरणातील पाणी हे माहे जून महिन्यापर्यंत प्रथम प्राधान्याने पिण्याच्या वापराकरीता तसेच शेतामधील उभी पिके वाचविण्याकरीता राखून ठेवावे. यासंदर्भात योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्येही व पालकमंत्र्यांकडे मांडल्याचे आ. देसाई यांनी यावेळी सांगितले.

यावर जिल्हाधिकारी सिंघल यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. आ. देसाई म्हणाले, मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षी 90 टक्के होता. आता तो 65 टक्केपर्यंत आला आहे, ही गंभीर बाब आहे. तारळी-उत्तरमांड व वांग मराठवाडी तसेच महिंद धरण प्रकल्पातील पाणीसाठा समाधानकारक आहे परंतु पिण्याच्या पाण्याकरीता व शेतातील उभी पिके वाचविण्याकरीता नियोजन करणे आवश्‍यक आहे.

अधिक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी 1 जून ते 31 मे असा पाणीसाठा मोजला जातो. पूर्वेकडे यावर्षी गतवर्षीपेक्षा सिंचनाकरीता पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. पूर्वेकडून सांगली जिल्हयातून पाण्याची मागणी होत असल्याने पाणीवापराचे फेरनियोजन करणे आवश्‍यक आहे. सांगली पाटबंधारे मंडळ यांना पाणीवाटप समितीची बैठक आयोजित करण्याचे लेखी पत्र दिले आहे. 10 ते 20 टक्के पाणी गतवर्षीपेक्षा कोयना धरणामध्ये जादा ठेवण्याची गरज असल्याची मागणी या बैठकीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तालुकास्तरावर लवकरच बैठक

जिल्हाधिकारी सिंघल यांनी पाटण आणि कराड तालुक्‍यातील दुष्काळ जाहीर केलेल्या गावांची परिस्थिती पाहता आमदार देसाई यांच्या मागणीनुसार कोयना धरणातील पाण्याचे नियोजन करावे. पाण्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे सांगली पाटबंधारे मंडळास कळवावे, असे सूचित केले. तसेच पाटण तालुक्‍यातील इतर धरण प्रकल्पातील पाणीसाठा राखून ठेवण्यासंदर्भात आमदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर बैठका आयोजित कराव्यात अशाही सूचना यावेळी केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)