कोपर्डी -नवीन साक्षीदार तपासण्यास न्यायालयाची मंजुरी

तर आरोपीचा दंड माफीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
नगर, दि.20 (प्रतिनिधी )- कर्जत तालुक्‍यातील कोपर्डी येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनाच्या खटल्यात नवीन साक्षीदार तपासण्यास जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी (दि.20) मंजुरी दिली आहे. तर दंडाची रक्कम माफ करण्यात यावी असा आरोपी संतोष भवाळ याने न्यायालयात केलेला अर्ज न्या. केवले यांनी फेटाळून लावला आहे.
कर्जत तालुक्‍यातील कोपर्डी येथे दि. 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात जितेंद्र शिंदे उर्फ पप्या शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे या तिघांना अटक केल्यावर या तिघांविरुध्द जिल्हा न्यायालयात न्या. सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरु आहे. या खटल्यात एक नवीन साक्षीदार तपासण्यासंदर्भात विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर दोन दिवसांपुर्वी सुनावणीही झाली होती. त्या अर्जावर आरोपींच्या वकिलांनी हरकत घेतली होती. मात्र सदरची हरकत फेटाळून लावत सरकारचा अर्ज न्यायालयाने मंजुर केला आहे. त्यामुळे नवीन साक्षीदाराकडून या खटल्यात अधिक महत्वाची माहिती पुढे येण्याची शक्‍यता आहे.
दरम्यान आरोपीचे वकिल आजारपणामुळे न्यायालयात हजर राहत नसल्याने पर्यायी वकिलाची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने आरोपीला दिले होते. परंतु त्याने पर्यायी वकिलाची व्यवस्था न केल्याने न्यायालयाने 19 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यावर आरोपी सदरचा दंड हा माफ करण्यात यावा आपली आर्थिक परिस्थिती नसल्याचे नमुद केले. त्यावर सरकार पक्षाचे ऍड. निकम यांनी हरकत घेतली. भवाळ याने वकिल लावला असून खोपटे हे स्वत:च्या खाजगी वाहनाने येतात. त्यातून आरोपीचे वकिलांशी असलेले संबध व आरोपीचे आर्थिक स्थिती चांगली असून तो दंड वसुल करण्यात यावा अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. तसेच आरोपीला दंड केल्यास न्यायालयाचाही धाक राहिल असेही ऍड. निकम यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळून लावत 19 हजार रुपयांचा दंड कायम ठेवला. तसेच महसुल अधिनियमन कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीकडून 19 हजार रुपयांचा दंड वसुल करण्याचाही आदेश दिला आहे. दरम्यान या खटल्यातील दोघांची उलट तपासणी घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)