कोपरगावच्या विकासासाठी काळे परिवाराची तीन पिढ्यांची लढाई… (भाग 2)

एकेकाळी पाण्याने समृद्ध असलेला जिल्ह्याच्या उत्तरेकडील शेवटचे टोक असलेला कोपरगाव तालुका आता दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. पाण्याचा लढा स्वर्गीय शंकरराव काळे, माजी आमदार अशोक काळे, युवानेते आशुतोष काळे यांच्या रूपाने सुरू आहे. कोपरगाव तालुक्‍याच्या विकासासाठी काळे परिवाराची तिसरी पिढी प्रयत्न करीत आहेत.

स्व. काळेंचा वारसा जपण्याची जबाबदारी माजी आमदार अशोक काळे यांनी चोखपणे बजावली. कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांचे हित जपले. 2004 मध्ये कोपरगावच्या जनतेने त्यांना आमदारकी देऊन तालुक्‍याचे नेतृत्व त्यांच्या स्वाधीन केले. आमदारकीच्या कारकिर्दीत कोपरगाव तालुक्‍यात कदाचित सत्ताधारी आमदारालासुध्दा करता येणार नाही अशी विकास कामे विरोधी पक्षाचा आमदार असूनही करून दाखविले. गोदावरी नदीला पावसाळ्यात थोडे जरी पाणी आले तरी तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटत होता. नदीच्या पाण्यामुळे कोपरगाव शहराचे दळणवळणाचे मार्ग बंद होत होते. संपर्क तुटल्याने शहराची बाजारपेठ ओस पडत होती. ही जिव्हाळ्याची समस्या सोडविण्यासाठी अशोक काळेंनी गोदावरी नदीवरील सर्व पूल बांधण्याचा निश्‍चय केला. विरोधी पक्षाचा आमदार असूनही तालुक्‍यातील कुंभारी-धारणगाव, वारी, चासनळी व कोपरगाव शहर-बेट भागाला जोडणारा पूल अशा चार पुलांचे प्रश्न मार्गी लावले. या पुलांमुळे संपूर्ण कोपरगाव तालुका जोडला गेला. कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत शेवटची घटका मोजत होती. त्यांनी विशेष प्रयत्न करून ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत आमदारकीच्या कारकिर्दीत बांधून दिली. ग्रामीण रूग्णालयासारखीच अवस्था तहसील कार्यालयाची झाली होती. हाही प्रश्न सोडवून त्यांनी सुसज्ज इमारत उभारली. कोपरगाव शहराच्या बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न सोडविताना तालुक्‍यातील महत्वाच्या रस्त्याची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जनतेने टाकलेला विश्वासाला आपल्या विकास कामातून सार्थ करण्याचा चंग बांधलेल्यांपैकी अशोक काळे एक होय. त्यांनी कोपरगाव तालुक्‍याचा विजेचा प्रश्न सोडविताना सहा विद्युत उपकेंद्रे उभारली. कायदा-सुव्यवस्थेसाठी कोपरगाव शहर व कोपरगाव ग्रामीण अशा स्वतंत्र दोन पोलीस स्टेशन निर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले. जनकल्याणाच्या विविध विकास कामांना प्राधान्य देऊन अशोक काळेंनी विकासाचा अनुशेष भरून काढला. सत्ताधारी आमदार आणू शकणार नाही इतका निधी आपल्या मतदारसंघात आणून विकासाला चालना दिली. तालुक्‍यातील विकास कामे करताना अशोक काळे यांनी कोणतेही राजकारण डोळ्यासमोर न ठेवता सामान्य नागरिकांच्या विकासावर भर दिला. जनतेच्या या विश्वासामुळे ते दुसर्यांदा आमदार झाले. स्व. शंकरराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत कोपरगाव तालुक्‍याच्या हक्काच्या पाण्याचा लढा अशोक काळे यांनी जीवंत ठेवला. तालुक्‍याचे हक्काचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या निर्णयाला कोर्टाकडून स्थगिती मिळवून मराठवाड्याकडेजाणारे पाणी थांबविले. पाण्यामुळे तालुक्‍यातील सहकार टिकेल व सर्वसामान्य माणूस, शेतकरी टिकू शकतो अशी उच्च विचारसरणी असलेल्या स्व.काळे म्हणजे त्यांच्या वडिलांचा वारसा लाभल्याने विकास कामात येणा-या अडथळ्यांना सोबती मानून पक्षीय राजकारण बाजूला ठेवत विकास साधला. तालुक्‍याच्या हिताचे व वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कामांना अशोक काळे यांनी प्राधान्य दिले. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाला जोडणारा गोदावरी नदीवरील धारणगाव-कुंभारी पूल, कुंभारी (हिंगणी) 33/11 केव्हीए वीज उपकेंद्र, कोपरगाव औद्योगिक वसाहत, खिर्डी गणेश, करंजी येथील उपकेंद्रे, केंद्रीय मार्ग निधीतून सावळीविहीर-भरवस या महत्वाच्या रस्त्याच्या चौपदरीकरण व नूतनीकरण, कोपरगाव तालुक्‍याच्या दक्षिण भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची उजनी चारी योजना, कोपरगाव येथील 220 केव्हीए उपकेंद्र, कोपरगाव येथील पशु चिकित्सालय, धामोरी रस्त्यावरील कुर्ला नाल्यावरील पूल, गोदावरी कालवे नूतनीकरण अंतर्गत जलसेतू व कालवा मो-यांची कामे, कोपरगाव शहर, तालुक्‍यातील बेट भाग, उक्कडगाव, कोकमठाण, वारी, कान्हेगाव, माहेगाव-देशमुख, संवत्सर, ब्राम्हणगाव, मायगाव-देवी, मंजूर, पोहेगाव, चास, कुंभारी येथील तीर्थक्षेत्रांना क दर्जा मिळवून दिला.

आशुतोष काळेंना कोपरगाव तालुक्‍यातील जनतेच्या स्वप्नातील तालुका उभा करायचा आहे. या तालुक्‍यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नाची जाण त्यांना आहे. या तालुक्‍याच्या हक्काच्या पाण्याच्या लढाईचे सूत्र त्यांनी हातात घेतले असून माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व. शंकरराव काळे यांच्या कृतिशिल विचारामुळे त्यांना आजपर्यंत प्रत्येक लढ्यात यश मिळत आहे. शेतीसाठी शाश्वत पाण्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत स्वस्थ न बसण्याचा त्यांचा निर्धार आहे. आजोबा व वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून कोपरगाव तालुक्‍याच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे काम आशुतोष काळे करीत आहेत.

इंडिया बुल्स कंपनीला 3.20 टीएमसी पाणी नाशिक शहराच्या सांडपाण्यातून देण्याचे करारात आहे. पाणी गोदावरी नदीतून कंपनी उचलत आहे. कंपनीला दिलेले नाशिक शहराचे सांडपाणी यापूर्वी गोदावरी कालव्यांना दिले जात होते. या कंपनीला जर पाण्याची इतकी आवश्‍यकता असेल तर या कंपनीने अपूर्ण असलेले धरण प्रकल्प आपल्या पैशाने पूर्ण करून स्वतःचे पाणी उपलब्ध करावे किंवा अपूर्ण असलेल्या धरणप्रकल्पांना आर्थिक मदत देऊन प्रकल्प पूर्ण केल्यास गोदावरी कालव्यांना पाणी अधिक प्रमाणात मिळून ऊर्जितावस्था प्राप्त होईल. कोपरगाव तालुका पुन्हा महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून देशात मानाचे स्थान मिळवील यात कोणतीही शंका नाही.

संबंधित वृत्त – कोपरगावच्या विकासासाठी काळे परिवाराची तीन पिढ्यांची लढाई… (भाग 1)

सामाजिक, धार्मिक कामे करत कोपरगाव तालुक्‍याच्या जनतेचा विश्वास सार्थ ठरविला. प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांचा पिंड नाही. कामातूनच ओळख निर्माण व्हावी, अशी त्यांची विचारसरणी आहे. तालुक्‍याला विकासाच्या वाटेवर आणून ठेवण्याचे काम अशोक काळे यांनी आमदारकीच्या कारकिर्दीत केले.सत्ता आणि खुर्ची ही भल्याभल्यांना सोडाविशी वाटत नाही. पण याला अपवाद अशोक काळे आहेत. सलग दहा वर्षे आमदारकीची संधी मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढविली नाही.

आजोबा स्व.शंकरराव काळे, वडील अशोक काळे यांच्या विचाराची शिकवण अंगी असलेले युवानेते आशुतोष काळे हेही काळे घराण्याचा संपन्न वारसा पुढे चालवत आहेत. उच्च विद्याविभूषित, भेटणा-याला पहिल्या भेटीतच आपलेसे करून टाकणारे त्याचे व्यक्तिमत्व आहे. कोणताही मान नाही, कसलाही अभिमान नाही. आलेल्या प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करणे आणि प्रत्येकाची अडचण समजून घेत ती सोडविण्याचा प्रयत्न करणे ही त्यांच्या स्वभावाची विशेष ओळख. 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी तो खिलाडू वृत्तीने स्वीकारत तालुक्‍यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले. मतदारांनी आशुतोष काळेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विधानसभेच्या वेळी झालेली चूक सुधारून 29 ग्रामपंचायतीपैकी तब्बल 17 ग्रामपंचायतींची सत्ता त्यांना सोपविली. या अभूतपूर्व यशाने कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकली. पुढील प्रत्येक निवडणुकीत अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळत गेले. कोपरगाव पंचायत समितीतील विरोधकांची अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आपला झेंडा फडकावला.

आज आशुतोष काळे यांच्याकडे संपूर्ण कोपरगाव तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. आशास्थान म्हणून प्रत्येक तरूण त्यांच्याकडे पाहत आहे. त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी, अभ्यासूपणा आणि कोपरगाव तालुक्‍याच्या जनतेला हवे असणारे नेतृत्वगुण त्यांच्याकडे आहेत. कोपरगाव तालुक्‍याला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दुष्काळाच्या खाईत लोटलेला हा तालुका पुन्हा सुजलाम सुफलाम करायचा असा त्यांनी मनाशी ठाम निश्‍चय केलेला असून त्यांचे प्रत्येक पाऊल हे त्याच दिशेने वाटचाल करीत आहे.तालुक्‍यातील जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी आजपर्यंत अनेक आंदोलने केली. तालुक्‍याच्या ह्क्काच्या पाण्यासाठी कोणताही वाद निर्माण न करता प्रत्येक भागाची पाण्याची गरज ओळखून नवीन पाण्याची निर्मिती होणे काळाची गरज आहे. पाण्याची निर्मिती ही पाण्याच्या बचतीतून आणि वाया जाणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून होणार आहे. धरणांचे प्रकल्प निधीअभावी रखडलेले आहेत. अशा प्रकल्पांना लवकरात लवकर निधी उपलब्ध कसा होऊ शकतो याचा विचार करणे महत्वाचे आहे. गोदावरी कालवे हे तुटीचे खोरे असून ही तूट भरून काढण्यासाठी 5 टीएमसी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असणारे एकदरा धरण व भुदरगड आणि खारगीहिल धरण या धरणांची 20 टीएमसी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. केंद्र शासनाच्या नद्याजोड प्रकल्पांतर्गत या धरणांची कामे पूर्ण झाल्यास पाण्याचा साठा वाढेल आणि कोपरगावला पूर्वीचे वैभव मिळण्यास वेळ लागणार नाही. गरज आहे शासनाच्या मानसिकतेची.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)