कोपरगावच्या विकासासाठी काळे परिवाराची तीन पिढ्यांची लढाई… (भाग 1)

 एकेकाळी पाण्याने समृद्ध असलेला जिल्ह्याच्या उत्तरेकडील शेवटचे टोक असलेला कोपरगाव तालुका आता दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. पाण्याचा लढा स्वर्गीय शंकरराव काळे, माजी आमदार अशोक काळे, युवानेते आशुतोष काळे यांच्या रूपाने सुरू आहे. कोपरगाव तालुक्‍याच्या विकासासाठी काळे परिवाराची तिसरी पिढी प्रयत्न करीत आहेत.

एकेकाळी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया समजला जाणारा कोपरगाव तालुका आज पाण्याअभावी वाळवंट होत चालला आहे. तालुक्‍याला बारमही मिळणारे धरणाचे पाणी कमी झाले. पाण्याअभावी तालुक्‍यातील शेती उजाड झाली. धरणाच्या पाण्यावर विविध प्रकारचे आरक्षण लादल्याने तालुक्‍यातील शेतीचा कोळसा झाला. माणसांना पिण्यासाठी पाणी वेळेवर मिळेना ही अवस्था तालुक्‍याची झाल्याने तालुक्‍यातील शेतकरी व व्यापारी, नागरीक अस्वस्थ झाले आहेत. दरवर्षी पाण्यासाठी वादविवाद ठरलेला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाकडे तालुक्‍यातील जनता व राजकीय नेत्यांना डोळे लावून बघत बसावे लागते. घशाला कोरड पडेपर्यंत आरडाओड केल्यानंतर कुठे तरी पाणी मिळते. पाण्याअभावी तालुक्‍यातील शेती संपुष्टात येत आहे. धरणातील पाण्याच्या साठ्यावरून नाशिक, नगर, मराठवाडा वाद नित्याचा झाला आहे. या वादावर अनेक राजकीय मंडळी आपली पोळी भाजून घेत आहेत. यापुढील काळात आणखी भीषण समस्या होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सर्वांना पाण्याची गरज अधिक भासणार आहे. एकमेकात वाद करण्यापेक्षा सर्वांना मुबलक पाणी मिळण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग आवश्‍यक आहे. त्यासाठी समुद्राला मिळणारे पाणी गोदावरी खोर्यात वळवून नवीन पाण्याचा साठा वाढविणे गरजेचे असून, साठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुक्‍याचे युवानेते आशुतोष काळे प्रयत्नशील आहेत.

अवेळी येणारा पाऊस, गारपीट आणि कमी झालेले पर्जन्यमान अशा संकटांबरोबरच धरणाचे पाणी कमी झाल्याने तालुक्‍यातील शेती उजाड झाली. कमी पाण्यावर कष्टाने फुलवलेली शेती अवकाळी पाऊस व गारपिटीने नेस्तनाबूत होते. समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या नावाखाली कोपरगाव तालुक्‍याच्या ह्क्काचे पाणी बळीराजाच्या डोळ्यादेखत मराठवाड्याच्या दिशेने वाहत जाते. पोटच्या मुलांप्रमाणे जपलेली पिके पाण्याअभावी माना टाकू लागतात. उभे पिके जळताना बळीराजाच्या पोटात कालवाकालव होते. पण करणार तरी काय? सगळ्यांचा रुसवा काढता येऊ शकेल परंतु निसर्गाचा रुसवा कोण काढणार हा अनुत्तरीत प्रश्न समजून तालुक्‍यातील शेतकरी आला दिवस आभाळाकडे पाहून काढतोय. या तालुक्‍यातील पिचलेल्या शेतकर्यांसाठी लढा देण्याचे काम काळे परिवाराने केले आहे. यापुढे हे सामाजिक कार्य आशुतोष काळे करीत आहेत. तालुक्‍याचे हक्काचे गेलेले पाणी परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सॅडलडॅम व कटक योजना लाभदायी
माजी आमदार अशोक काळेंनी 2005 मध्ये नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरण समुहांचा तीन दिवसांचा दौरा करून शासनाला मूळची पूर्ववाहिनी असलेली पण मुंबईसाठी पश्‍चिमवाहिनी केलेल्या वैतरणा नदीचे समुद्राला वाहून जाणारे पाणी ज्या पाण्याला मुंबईकरही विरोध करणार नाही ते पाणी सॅडलडॅम व कटक योजना राबवून गोदावरी खो-यात वळविण्यासाठीचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी शासनाने तत्वतः मान्यता दिली. पण आर्थिक तरतूद न केल्याने ही योजना प्रलंबित आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास गोदावरी खो-यात 10 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. या कामाचा सर्व्हे झाला असून या प्रकल्पांचे काम त्वरीत हाती घेण्याची गरज आहे.

त्यांचे आजोबा, माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांनी आपले संपूर्ण जीवन तालुक्‍यातील शेतकर्यांच्या हितासाठी व हक्काच्या पाण्यासाठी लढून घालवले. भविष्यातील पाण्याची लढाई स्वर्गीय शंकरराव काळे यांना ज्ञात असल्याने त्यांनी काळे यांनी पाण्यासाठी अनेकवेळा संघर्ष केला. आपण या समाजाचे काही तरी देणे लागतो असे मानणारे ते दूरदृष्टीचे नेतृत्व होते. तालुक्‍याच्या विकासाबरोबर हक्काच्या पाण्यासाठी सतत लढा दिला. या तालुक्‍यातील बळीराजाला भविष्यात पाणी पाणी करण्याची वेळ येणार याची कल्पना स्व. काळे यांना 1985 साली आली होती. कोपरगाव तालुक्‍याने 1972च्या दुष्काळाचे तीव्र चटके सहन करीत दुष्काळावर मात करून वैभव मिळविले होते. दारणा धरणामुळे गोदावरी खोर्यातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांना बारमही पाणी मिळत होते. पाऊस नसला तरी धरणाच्या पाण्यामुळे विकासाची गंगा सुरू झाली. उसाची शेती फुलली. तालुक्‍यात एकाच वेळी तीन खासगी व तीन सहकारी साखर कारखान्यांची निर्मितीझाली. सर्वाधिक ऊस पुरविणारा तालुका अशी कोपरगाव तालुक्‍याची ओळख देशात झाली होती.

संबंधित वृत्त –  कोपरगावच्या विकासासाठी काळे परिवाराची तीन पिढ्यांची लढाई… (भाग 2)

मात्र, समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली कोपरगाव तालुक्‍याचे हक्काचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले. पाण्यासाठी काही उपाय योजना केल्या नाहीत तर हा वैभवसंपन्न तालुका उजाड होईल हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यामुळे त्यांनी कोपरगाव तालुक्‍याच्या हक्काच्या पाण्याचा लढा 1985 ते 1995 या कालावधीत सुरू केला. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेती पाण्याअभावी उजाड होत होती. महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळे लढत होते. पाणीप्रश्नावर सखोल अभ्यास करून स्व. काळे यांनी ‘अंतरलेले पाणी’ या शीर्षकाचे पुस्तक लिहून दारणा-गंगापूर धरणातील गोदावरी कालव्यांचे ह्क्काचे 11 टीएमसी पाणी नांदूर मध्यमेश्वर बंधार्यामधून मोजून द्यावे म्हणून राज्य शासनाकडे आग्रह धरला. हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम आवाज उठविला. विरोधकांनी त्यांच्यावर ‘पुस्तक लिहून कधी पाणी मिळते का?’ अशी उपहासात्मक टीकाही केली. पण त्यावेळेसच्या टीकाकारांनाही आता जाणवत असेल की, जे पाणी आता मिळत आहे किंवा तालुक्‍याचे पाणी काही प्रमाणात आहे ते स्व. काळेंमुळेच. स्व. काळे यांनी हक्काच्या पाण्यासाठी 17 एप्रिल 1989 रोजी कोपरगाव ते मुंबई पायी दिंडी काढून शासनाचे लक्ष वेधले होते. तर 16 ऑक्‍टोबर 1989 रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळी उपोषणाला बसले. कोपरगाव तालुक्‍यात दुष्काळी पाणी परिषद घेऊन रास्ता रोको आंदोलनात सामान्य शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणारे स्व. काळे यांनी पाणीप्रश्नासाठी काहीही करण्याची तयारी सुरू केली होती. गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील ब्लॉकधारक शेतक-यांना पाटबंधारे खाते 14 दिवसांनी पिकांना पाणी देत होते. गोदावरी कालव्यावरील बिगर सिंचनाचे आरक्षण जसे वाढत गेले तसे कालव्यांना पाणी कमी मिळू लागले. 1985 मध्ये तर तब्बल 80 दिवसांनी कालव्याचे आवर्तन सुटले. त्यामुळे काळे यांनी तालुक्‍यातील शेतक-यांसमवेत आंदोलने व मोर्चे काढले. तरीही दाद न देणा-या शासनाच्या विरोधात 1993 साली कोर्टात दावा दाखल केला. ज्याप्रमाणे पाण्यासाठी लिहिलेल्या पुस्तकावर टीका झाली, त्याप्रमाणे टीका कोर्टात दाखल केलेल्यादाव्यावरही झाली. पण या दाव्याचा निकाल शेतक-यांच्या बाजूने लागून कोर्टाने ब्लॉकधारक शेतक-यांची विनंती मान्य करून त्यांचे हक्काचे पाणी पूर्ववत द्यावे असा आदेश दिला. स्व. काळेंचा हा संघर्ष भावी पिढीला दिशा देणारा ठरला.

कालव्यांच्या आणि सरकारच्या भरवशावर न बसता नवीन पाण्यासाठी आपण काही उपाययोजना करु शकतो का? अशा विचाराने स्वर्गीय काळे यांनी जलसंधारणाची मोठी कामे उभी केली. हक्काचे पाणी मिळेल तेव्हा मिळेल, पण पर्यायी इतर व्यवस्था करण्यासाठी त्यांनी शासनाच्या मदतीने गोदावरी नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधा-यांची साखळी तयार करून डाऊच, माहेगाव-देशमुख, वडगाव-कांदळ व सडे (संयुक्त) बंधारे बांधले. गावागावात साठवण तलाव, गावतळी निर्माण करून ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ उपक्रम राबविले. त्यामुळे हजारो हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले.

शेती, शिक्षण, उद्योग या विकासाभिमुख कामामुळे काळे यांचे नेतृत्व समाजानेही मान्य केले. राज्यामध्ये त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली व ते खासदार, मंत्रीही झाले. त्यांची राजकीय ओळख चार लोकांना बरोबर घेऊन त्यांच्यातील गुणांना फुलवून त्यांच्याकडून असाधारण काम करून घेणे अशी होती. शिक्षण प्रसारासाठी पदरचं सगळं काही देणारी, शेतक-यांच्या तसंच परिसराच्या विकासासाठी झटणारी व्यक्ती अशी खास ओळख स्व. काळे यांची होती. ‘गीव्ह अस वेस्ट लॅण्ड, वुई विल टर्न इट इनटू बेस्ट लॅण्ड’ असं कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या भाषणातून शिक्षणाचा प्रसार करताना नेहमी म्हणत. कर्मवीरांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या स्व. काळे यांनी आपल्या जीवनाचे हेच तत्वज्ञान बनवले आणि आपल्या पुढच्या पिढीला शिकवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)