कोपरगावकरांना होणार सहा दिवसांनी पाणीपुरवठा

कोपरगाव: कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील चार साठवण तलावांत केवळ आगामी एक महिना दहा दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा शिल्लक आहे. तसेच नाशिक येथील धरण परिक्षेत्रातून सोडण्यात येणारे पाणी उशिराने सोडण्यात येणार असल्याने नगरपालिकेच्यावतीने शहरास सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर निघत आहे.

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. पालिकेचे येसगाव येथील चार साठवण तलाव 12 डिसेंबरला काठोकाठ भरून घेण्यात आले. पाटबंधारे खात्याने या पुढील आवर्तन फेब्रुवारी महिन्यात देण्याचे पालिकेस कळविले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे. क्रमांक एकच्या तळ्याची क्षमता 7 फूट असून, त्यात आजमितीस 2.6 फूट, दोन क्रमांकाच्या तळ्याची क्षमता 6 फूट असून, त्यात 5.9 फूट, तर तीन क्रमांकाच्या तळ्याची 9.5 फूट क्षमता असून, त्यात 8.8 फूट, तर शेवटच्या चार क्रमांकाच्या तळ्याची क्षमता 11 फूट असून, त्यात आज 7.9 फूट पर्यंत पाणी आहे. शहराला एक आवर्तन देण्यासाठी अंदाजे 3 फूट पाणी लागते. सध्या शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, असाच पुरवठा सुरू ठेवला व गळती, बाष्पीभवन गृहीत धरले, तर जानेवारीत सर्व साठवण तलाव रिकामे होतील. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिवाळ्यातच सहा दिवसांआड पाणीपुरवठा होणार असेल, तर उन्हाळ्यात किती दिवसांआड पाणी मिळेल, याचा अंदाज लावणे कठीण आहे. धरणांत पाणी कमी असल्याचे कारण दाखवत जलसंपदा विभागाने रोटेशन उशिरा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सहा दिवसांनी एकदा पाणी मिळणार आहे. नागरिकांना दरवर्षी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. नागरिकांचे पाण्यासाठीचे हाल कमी करण्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे धरणातून बंद पाईपलाईनद्वारे शहराला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पाणीपुरवठामंत्री यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून पाठपुरावा केला आहे. मात्र केवळ निळवंडेचे पाणी कोपरगावच्या नागरिकांना पिण्यासाठी मिळू नये, यासाठी काही आमदार कोल्हे यांच्या विरोधात कोर्टात जाऊन स्थगिती आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पाऊस नसल्याने धरणांत पाण्याचा तुटवडा आहे. त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जायकवाडीला पाणी सोडल्याने जलसंपदा विभागाचे नियोजन बिघडले आहे. आगामी फेब्रुवारीत पाणी येणार असल्याने कोपरगाव शहराला आता 29 डिसेंबरपासून सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. महिन्यातून केवळ सहा दिवसच पाणी मिळणार आहे. त्यामुळे आता जनतेच्या डोळ्यांतून पाणी येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)