कोथिंबिरीला महागाईचा “तडका’!

आवक घटली : मागणीत मात्र मोठी वाढ

पुणे – मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कोथिंबिरीचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला 7 ते 20 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात तब्बल 25 ते 30 रुपये जुडी भावाने कोथिंबिरीची विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून कोथिंबिरीचे भाव सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात नववर्षामुळे उपाहारगृह चालकांकडून कोथिंबिरीला मोठी मागणी राहिल्याने भाव वाढले होते. गेल्या आठवड्यात कोथिंबिरीच्या एक लाख जुडींची आवक घाऊक बाजारात झाली होती. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी (6 जानेवारी) 70 हजार जुडींची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या शेकडा जुडीमागे 400 रुपयांनी वाढ झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील विक्रेते निखिल भुजबळ यांनी दिली.

दरम्यान, रविवारी पुण्यातील घाऊक बाजारात गुजरातमधील गौरी प्रजातीच्या कोथिंबिरीची आवक झाली. नऊ गाड्यांमधून गुजरामधील कोथिंबीर बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आली होती. थंडीमुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या पालेभाज्यांची आवकही मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे कोथिंबिरीसह इतर पालेभाज्यांचे भावही तेजीत असल्याची माहिती किरकोळ बाजारातील व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

गावरान कोथिंबिरीला मागणी
गुजरातमधील कोथिंबिरीची आवक सुरू झाली असली, तरी गृहिणींकडून गावरान कोथिंबिरीला मागणी जास्त असते. गावरान कोथिंबिरीची पाने लहान असतात, तसेच या कोथिंबिरीचा सुवास असतो. शिवाय त्यामुळे खाद्यपदार्थांना चांगला स्वाद येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)