कोतवाल संघटना बेमुदत आंदोलनावर ठाम

पुणे जिल्ह्यात महसुलातील कामात विस्कळीतपणा

थेऊर- कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळणेकामी पुणे जिल्ह्यातील कोतवालांनी बेमुदत कामबंद आंदोलन केल्याने नागरिकांची महसूल विभागातील कामे रेंगाळली आहेत. नागरिक व महसूल प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा समजला जाणारा कोतवाल संवर्ग महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या आश्वासनावर नाखूष असून, संपावर ठाम राहिल्याने प्रशासनासमोर पेच वाढला आहे. संपकाळामुळे तलाठी व सर्कल कार्यालयात खासगी (कॅन्डेट) व्यक्तीचा राबता वाढल्याने नागरिकांची अडवणूक सुरू झाली आहे.
महसूलमंत्र्यांनी मानधन वाढीबाबत निर्णय घेऊनही हा संप मिटवण्यासाठी प्रशासनाला यश मिळाले नाही, कारण तुटपुंज्या पगारावर काम करणारा कोतवाल अजूनही दुर्लक्षितच राहिल्याने कोतवालांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तयार झालेल्या कोतवाल पदास पदोन्नती न मिळता, कमी मासिक वेतनावर बोळवण झाल्याने राज्यभरातील कोतवाल बेमुदत संपावर ठाम राहिले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात कोतवालांचे आंदोलन सुरू आहे. त्याकामी कोतवालांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्हा महसूल कर्मचारी कोतवाल संघटनाही बेमुदत आंदोलनात उतरल्याने महसूलमधील वसुली, स्थळपाहणी, पंचनामा, संगणकीकृत सातबारा व आठ-अ उतारा, वरिष्ठ कार्यालयातील टपाल, आवक जावक पत्रे, गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीचा दंड आदी कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. या संपामुळे तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडील कामावरही मर्यादा आल्या आहेत.
कोतवालांना चतुर्थश्नेणीचा दर्जा मिळणेकामी तातडीने निर्णय व्हावा, ज्येष्ठतेनुसार शिपाई संवर्गात पदोन्नती, कोतवालांचे शोषण थांबविणे, तलाठी कार्यालयातील खाजगी मदतनीस हटवणे, वरिष्ठ कार्यालयात कामासाठी बोलवल्यास प्रवास भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कोतवाल संघटनेने बेमुदत आंदोलन करून राज्यव्यापी आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)