कोणी बक्षिसे देता का बक्षिसे !

इथोपियाच्या 19 खेळांडूंवर पालिकेचे उंबरे झिजविण्याची वेळ


20 लाखांच्या बक्षिसांचे धनादेश वटेनात

पुणे – पुणे आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते ठरलेल्या इथोपियाच्या 19 खेळाडूंना बक्षिसांची 20 लाख रुपयांची रक्कमच मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेने दिलेले धनादेश या खेळाडूंनी त्यांच्या देशात “कर्मशियल बॅंक ऑफ इथोपिया’मध्ये जमा (डिपॉझिट) केले होते. मात्र, हे धनादेश कोणतेही कारण न देता, आयसीआयसीआय बॅंकेने परत पाठविले आहेत. त्यामुळे हे खेळाडू गेल्या महिनाभरापासून महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांचे उंबरे झिजवित आहेत.

भारतीय अॅथलेटिक्‍स महासंघाची मान्यता नसल्याने डिसेंबर-2017 मध्ये झालेली पुणे आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा चांगलीच गाजली. तसेच या स्पर्धेची बक्षिसांची रक्कम कोण देणार? यावरून गदारोळ झाला होता. ही मान्यता नसल्याने महापालिकेने बक्षिसांची रक्कम देऊ नये, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली. ही रक्कम देणार नसल्याचे तत्कालिन आयुक्तांनी जाहीर केले होते. मात्र, नंतर अचानक गाजावाजा न करता ही रक्कम देण्यात आली. त्यासाठी विजेत्या खेळाडूंना त्यांच्या नावाचे धनादेश देण्यात आले. त्यातील इथोपियाच्या 19 खेळांडूंचे धनादेश अजूनही वटलेले नाहीत. तसेच ती बक्षिसांचे धनादेश का देण्यात आले नाहीत, याचे कोणतेही कारण आयसीआयसीआय बॅंकेने कर्मशियल बॅंक ऑफ इथोपिया तसेच खेळाडूंना दिलेले नाही. “कर्मशियल बॅंक ऑफ इथोपिया’ने थेट भारतीय दुतावासाला पत्र पाठवून या प्रकाराची कळविली आहे. तसेच महापालिकेने दिलेल्या धनादेशांची मुदत उलटल्याने बक्षिसांचे नवीन धनादेश मिळावेत, यासाठी हे खेळाडू रोज एका विभागात आपल्या मागणीचे निवेदन देत आहेत.

अधिकाऱ्यांची कोंडी
याबाबत महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी मंगळवारी तातडीने या बॅंकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले. यावेळी या अधिकाऱ्यांनी “हे धनादेश एकाच खात्यात भरण्यात आले’ असा दावा केला. मात्र, त्यांना या खेळाडूंना त्यांच्या देशातील भरलेल्या बॅंकेत स्वत:च्या नावाच्या बॅंक खात्यात पैसे भरल्याचे जमा चलनच आपल्या अर्जासोबत जोडण्याचे दाखवून दिले. त्यावेळी बॅंक अधिकाऱ्यांचीही चांगलीच कोंडी झाली. त्यावर त्यांना काहीच उत्तर देता आले नाही.

रक्कम दोन दिवसांत देणार
या खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन बक्षीस रक्कम पुढील दोन दिवसांत त्यांना धनादेश न देता थेट त्यांच्या बॅंक खात्यात स्वीफ्ट पद्धतीने देण्यात येणार असल्याचे आयसीआयसीआय बॅंक अधिकाऱ्यांनी क्रीडा विभाग प्रमुख तुषार दौंडकर यांच्याकडे स्पष्ट केले. त्यासाठी या खेळाडूंची माहिती तसेच त्यांची काही प्रमुख माहिती बुधवारी संबधितांकडून तातडीने संकलित करून ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर पत्रकारांना सांगितले.

महापालिकेला….माहितीच नाही!
खेळाडूंना दिलेले धनादेश कशामुळे परत आले, याची कोणतीही माहिती महापालिकेलाही नाही. ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगत संबंधित क्रीडा विभाग, नगरसचिव विभाग आणि मुख्य लेखापाल या खेळाडूंना दुसऱ्या विभागामधे पाठवत आहेत. त्यामुळे पुण्यात धावून यश मिळविलेल्या या खेळाडूंना महापालिकेतही धावाधाव करावी लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)