कोणीतरी येणार गं पाहुणा!

हल्लीचे युग हे नियोजनाचे आहे. विशेषतः संतती नियोजनाचे. पूर्वीसारखे लग्न झाले की, लगेच “आलेच पोट’ असे आता सहसा होताना दिसत नाही. नव्या जोडप्याला होणारे मूल हे “बाय चान्स’ नको असते; तर ते “बाय चॉईस’ हवे असते, जे खूप चांगले आहे. आई-बाबा होण्याची व्यवस्थित तयारी झाल्याशिवाय नवीन जोडपे लगेच “चान्स’ घेत नाही. भावी आईलासुद्धा आपले करियर एका टप्प्यावर आल्यावर, हा निर्णय घेणे ती पसंत करते. हे सगळे त्या येणाऱ्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी.
जेव्हा ती योग्य वेळ येते तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. अगदी पुढे येणाऱ्या आर्थिक बाबींचे पण नियोजन होते. पण आता आपल्याला बाळ हवे आहे तर “आम्ही आता आपल्या खाण्या-पिण्यात काय काय घेतले पाहिजे’ असा विचार अजिबात केला जात नाही. “आम्ही’ हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे, आता आईच्या पोटात बाळ वाढणार आहे. त्यामुळे ती एकटी नाही. तिनेच फक्‍त खाण्या-पिण्याकडे लक्ष्य द्यावे, असे नसून ही गोष्ट भावी बाबालासुद्धा लागू होते. म्हणून दोघांचे (आणि पर्यायाने बाळासह तिघांचे) आहार नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण आज थोडक्‍यात याच नियोजनाची माहिती घेऊ. फक्‍त एकच नियोजन सगळ्यांचा लागू पडू शकत नाही; कारण प्रत्येकाची तब्बेत, तक्रारी, कमतरता या वेगवेगळ्या असतात. तरी ढोबळमानाने काय करायचे ते पाहूया.
आता हे आहार नियोजन हे किमान 3- 4महिने करावे व सगळ्यात महत्त्वाचे नवरा-बायकोने मिळून करावे. महिने हे छान पाळून झाले की, दोघांनाही आपल्या स्वतःच्या शरीरातला चांगला फरक जाणवायला लागेल आणि मग “चान्स’ घ्यावा. थोडक्‍यात, जे बीज चांगले रुजावे अशी इच्छा आहे त्यासाठी भूमी सकस तयार झाली, असे समजावे.
आता हे आहार नियोजन म्हणजे काही उपाशी राहणे नव्हे, तर दररोज खाण्यातून ते आवश्‍यक सत्वगुण मिळवणे. आता हे कसे बरे घेता येतील? दोघात मिळून विभागून खाण्यासाठी असे करावे…
(हे पदार्थ खाल्लेच पाहिजेत )
“प्रथिनांसाठी : दोन मूठ डाळ, दोन मूठ कडधान्य, एक मूठ बेसन/सोयाबीन/80 ते 100 ग्रॅम मांसाहार
“व्हिटॅमिनसाठी : दोन वाट्या पालेभाजी/लाल भोपळा/गाजर/टोमॅटो
“मिनरल्ससाठी : दोन वाट्या फळभाजी/दोन वाट्या बटाटे/रताळी/सुरण यांची भाजी, दोन फळे, दोन वाट्या कोशिंबीर
“ओमेगा-3 साठी : दोन मोठे चमचे तेल, दोन चमचे घरचे साजूक तूप
खालील पदार्थ गरजेप्रमाणे खावेत
” छोटे चमचे साखर
एक मूठ गहू पीठ, तांदूळ किंवा भाकरी वर्गातील पिठांचे पदार्थ
आता वरीलप्रमाणे जर दिवसभरात विभागून खाल्ले तर जे घटक मिळायला हवेत ते मिळतील. बाकी इतर काही खाल्ले तर पोट भरेल; पण शरीर मात्र उपाशी राहील आणि त्याचा परिणाम गर्भावर होईल. आता हे सगळे का? तर जेव्हा बाळ आईच्या पोटात वाढते तेव्हा आईचे शरीर जर सत्वगुणांनी पूर्ण असेल तर ते तिच्या शरीराकडून घेईल आणि वडिलांचे शरीर जर परिपूर्ण असेल तर त्यांनी दिलेला धातूसुद्धा परिपूर्ण व निर्दोष असेल. कोणताही पहिला एक पेशीसुद्धा निर्माण व्हायचा असेल’ तर त्याला पोषण, अन्न हवेच तेही चांगल्या दर्जाचेच हवे. आणि म्हणून सगळ्याचे मूळ हे आपण घेतो त्या आहारात आहे. चांगल्या प्रकारचे परिपूर्ण अन्न जर आई-बाबांनी खाल्ले तर त्यांची शरीरे, मन, बुद्धी यांच्या आरोग्याची पातळी उंचावेल. या तीन गोष्टींची मिळून व्यक्‍ती बनते. परिपूर्ण निरोगी व्यक्‍तीमधून निर्माण झालेली संतती ही परिपूर्ण असेल. म्हणून जसा डॉक्‍टरचा आपण सल्ला घेतो तसा, “आता आम्हाला बाळ हवे आहे आम्ही काय काय खाऊ?’ असा सल्ला आपल्या आहारतज्ज्ञांकडून नक्‍की घेऊया. आपल्या प्रकृतीप्रमाणे जे बदल आवश्‍यक आहे ते विचारून नक्‍की करूया आणि आपल्या गोजीरवाण्याला साद घालूया…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)