कोणतेच काम लहान नाही…

 संस्कार

अरुण गोखले

एका रस्त्यावर काही मजूर कामगार मोठमोठे लाकडाचे ओंडके उचलून गाडीत भरत होते. त्यांचा मुकादम त्या कामगारांचा लवकर लवकर काम करा म्हणून सांगत होता. स्वत: मात्र झाडाच्या सावलीत उभा होता. बिचारे कामगार भर दुपारच्या उन्हांत काम करत होते.

एक भला मोठा ओंडका मात्र काही केल्या त्यांना हलत नव्हता. ते नवनव्या शक्‍कल लढवीत होते. वेगवेगळे प्रयत्न करत होते. पण त्यांना ओंडका गाडीत चढवता येत नव्हता. कामगारांचा जीव पुरता मेटाकुटीला आला होता. त्यांना आणखी कुणाच्या तरी मदतीची गरज होती.

नाही म्हणायला त्यांचा मुकादम हा त्यांना मदत करू शकला असता. पण त्याचा स्वभाव इतरांना मदत करणारा, दुसऱ्याच्या श्रमाची किंमत करणारा असा नव्हताच मुळी. तेवढ्यात तिथे एक घोडेस्वार आला. त्याने त्या कामगारांना तो ओंडका हलवण्याचा प्रयत्न करताना पाहिले. त्याने कामगारांचे कष्ट पाहिले. त्यांचे घामाघूम झालेले चेहरे, दमलेले देह पाहिले. त्याला त्यांची दया आली.

पुढे होऊन तो घोडेस्वार त्या मुकादमास म्हणाला, “काय रे बाबा. किती दमली आहेत ही माणसं. तू जरा त्यांना मदत केलीस तर?'”ते काही माझं काम नाही,’ तो उत्तरला.”अरे ते तुझं काम नाही हे तर मलाही ठाऊक आहे. पण आपण जर त्यांना मदत केली तर तेवढंच त्यांच काम हलकं होईल, नाही का?’तो घोडेस्वार म्हणाला.

तेव्हा तो मुकादम उद्धटपणे त्या घोडेस्वारास म्हणाला, “ते तू मला कशाला सांगतोस. तुला जर त्यांचा कळवळा असेल तर तूूच का मदत करत नाहीस?”
आणि दुसऱ्याच क्षणी तो घोडेस्वार पुढे गेला, त्याने चटकन त्या कामगारांना ओंडका हलवायला. गाडीजवळ न्यायला. इतकेच नव्हे तर त्या गाडीत तो ओंडका चढवायलाही मदत केली.

काम होताच घोड्यावर स्वार होऊन जाताना त्या घोडेस्वाराने आपले ओळख कार्ड त्या मुकादमाच्या हातात दिले, आणि म्हणाला, “पुन्हा जर कधी मदत लागली तर मला बोलवा.’कामगारांना मदत करणारी ती व्यक्‍ती कोण ह्रे पाहायला मुकादमाने ते कार्ड पाहिले आणि तो आश्‍चर्यचकित झाला. कारण ते कार्ड होते चिफ कमांडर ऑफ आर्मीच्या जॉर्ज वॉशिंगटन यांचे. त्या एवढ्या मोठ्या माणसाच्या बोलक्‍या कृतीने मुकादमास एक धडा शिकवला. लोकांचा मोठेपणा हा केवळ त्यांच्या बोधवचनांतूनच सिद्ध होतो, असे नव्हे, तर छोटीशी कृतीही बरेच काही सांगून जाणारी ठरते,ती अशी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)