कोट्यवधीचे अमृततुल्य

   नीती अनीती

स्थळ – स्वर्गलोक वेळ- घोटाळे मोजून मार्च एंड साजरा करण्याची

‘नारायण नारायण!’ देवर्षी सभामंडपात प्रवेश करतात तसे सर्व सावध होतात व तातडीने करमणुकीचे कार्यक्रम अनिश्‍चित कालासाठी पुढे ढकलल्याची अनाउन्समेंट होते. काहीतरी नवीन व खमंग ऐकायला मिळणार या आशेने नर्तकी नृत्य थांबवतात व करमणूक होणार म्हणून प्रेक्षागृहात जाऊन बसतात. नारदमुनी ही मिश्‍किलपणे सर्वांकडे बघतात व फिरकी घेण्यासाठी सज्ज होतात.
‘प्रणाम देवेंद्र! देव दानवांनी नवरत्न मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले. नीलकंठाने हलाहल पचवले व उर्वरित देव अमृताची कुपी घेऊन पळाले याला किती वर्षे उलटली असतील बरं?’
‘देवर्षी, ब्रह्मदेवाचा एक पळ म्हणजे पृथ्वीतलावरील हजारो वर्षे हे विसरलांत, देवर्षी?’
‘देवेंद्रा, थेट उत्तर न देण्याची ही कला पृथ्वीतलावरील देवेंद्रासारखीच डेव्हलप केली आहेत बरं तुम्ही. नाव ही सारखेच व स्वभाव ही सारखाच हं…! नारायण नारायण. ‘
दरबारात खसखस पिकते.तसे देवेंद्र ही सरसावतात.
‘देवर्षी,आज चेष्टामस्करी करण्याचा मानस दिसतो आहे, आम्हीही तयार आहोत बरं.’
‘जरूर! मार्च एंडला सारे तंटे, मळभ संपवून टाकू म्हणजे पुन्हा नव वर्ष नवी सुरुवात.’
‘देवर्षी, तुमचे नारायण नारायण हे पालुपद कानी आले की स्वर्गलोकातं सारे सतर्क होतात तसेच पृथ्वीतलावरसुद्धा हे पालूपद कानावर पडले की शांतता भंगलीच म्हणून समजा. त्यांचेही वासे फिरलेच म्हणून समजा. काय जादू आहे हो या दोन अक्षरांत?’ देवर्षी खजिल झाले.
‘देवाजी पहिल्यांदा एखादा चांगला पंच मारला तुम्ही मजवर अन्यथा तुमचे पंच “चला, हवा येऊ द्या ‘मधील पंच सारखेच पांचट असायचे हं.’
‘देवर्षी, तारीफ करताय की नावं ठेवतायं? अमृतमंथनाची का आठवण झाली तुम्हांस?’
‘पृथ्वीतलावर अमृत म्हणजे चहा. देवेंद्र दरबारी चहाचे बिल आले तीन कोटी पन्नास लाख .’
‘आपण कधीपासून बिलं भरायला लागलो देवर्षी? आणि पृथ्वीतलावर तर बिलांशिवाय काही होतच नाही. चहाचे बिलं साडेतीन कोटी? भयंकर. ‘
‘केवढा मोठा कलश असेल तो. अहो, साडेतीन कोटींचे अमृत मंत्रालयात वाटले गेले.’
‘तरी शेतकरी आत्महत्या वाढल्यात. हे अमृत शेतकऱ्यांसाठी नाही काय?’
‘शेतकऱ्यांना उंदीर मारण्याचे औषध. विरोधक तर नेहमीच चहापानावर बहिष्कार घालत असतात, तेंव्हा हे बिलं फक्‍त स्वकीयांचे. आपणच तर देव आहात.’
देवर्षींचे बोल ऐकून देवेंद्र संतापाने लालबुंद होतात, देवर्षी खोखो करून हसायला लागतात.
‘देवर्षी, हा तुमच्याच पालुपदाचा महिमा आहे बरं. कळीचा नारद उगाचचं नाही म्हणतं आपणाला. जरा कुठे शांतता दिसली की आले भंग करायला. पृथ्वीतलावरसुद्धा देवेंद्र दरबारी नारायण अवतरले आणि शांतता निघून गेली बघा. नामाचा महिमा दुसरे काय? तखलीया…’
दरबार संपल्याची घोषणा होते, देवेंद्र पाय आपटत निघून जातात तर देवर्षी मंद स्मित करीत “नारायण नारायण’ म्हणत कैलास पर्वताकडे प्रस्थान करतात.

– धनंजय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)