कोट्यवधींच्या योजना ठरल्या कुचकामी

यवत,-कायमस्वरूपी दुष्काळी भागांना सिंचन क्षेत्राला वरदान ठरणारी पुरंदर सिंचन व जनाई – शिरसाई सिंचन योजना दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्‍यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आघाडी सरकारच्या काळात कार्यान्वित झाली. या योजनेमुळे शेतकरी वर्गात शेती सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्‍न मिटेल अशी आशा होती. परंतु ही योजना कित्येक वर्षांपासून सुरू होऊन सुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील गावे अद्यापही या पाण्यापासून वंचित असून सरकारचा उदासिनपणा व अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही योजनाच कुचकामी ठरली असल्याबाबात नाराजी व्यक्‍त केली आहे.
या योजनेच्या पाण्याचा नेतेमंडळी फक्‍त मते मिळविण्यासाठी या शेतकऱ्यांचा वापर करीत तर नाही ना? असा यानिमित्ताने प्रश्‍न उपस्थित होत आहे. या योजनेचे पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.
पुरंदर उपसा सिंचन योजनेतून (शिंदवणे, ता. हवेली) येथून दौंडच्या दक्षिणेकडील जिरायती भागासाठीच्या खूपटेवाडी फाट्यासाठी जलसंपदा विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून 19 किलोमीटर लांबीची बंदीस्त जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीद्वारे डाळींब, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, दरेकरवाडी, भरतगाव, कासुर्डी, यवत, भांडगाव, वाखारी या गावांचे पाझर तलाव, नाले उन्हाळ्यामध्ये पाण्याने भरण्याची योजना आहे. परंतु या योजनेचे कामे पूर्ण होऊन पाच वर्षे झाले तरी या गावच्या शेतकऱ्यांना या खूपटेवाडी फाट्याच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. अनेकवेळा संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी अधिकारी व नेत्यांकडे करूनही याची दाखल घेतली गेली नाही.
जनाई – शिरसाई सिंचन योजना ही वरवंड येथील व्हिक्‍टोरिया तलावातून बंद पाईपद्वारे उचल पाण्याची योजना आहे. या योजनेचा दौंड तालुक्‍यातील पडवी, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, खोर यासह आदी गावांना या योजनेचा लाभ होतो. परंतु या वर्षी जनाई – शिरसाई सिंचन योजनेतून उन्हाळा कडेला आला असून शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. तरी या सरकारची व अधिकारी वर्गाची या दोन्ही योजनेतून संबंधित लाभार्थी गावांना पाणी सोडण्याची मानसिकता दिसत नाही. शेतकरी वर्गाने या युती सरकारवर व अधिकारी वर्गावर नाराजी व्यक्‍त करीत आपला संताप व्यक्‍त केला आहे. या दोन्ही योजनेतून त्वरीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

आघाडी सरकारच्या काळात पुरंदर उपसा सिंचन व जनाई – शिरसाई सिंचन योजनेतून पाणी सोडले जात होते. परंतु सत्तेत असलेले हे युती सरकार पाणी सोडण्याबाबत दूजाभाव करीत आहे. – नितीन दोरगे, पंचायत समिती सदस्य, दौंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)