कोकणची भूमी हे केरळसारखीच देवभूमी – राज ठाकरे

मुंबई – अनेक आमदार, खासदार कोकणातून आले. मात्र आताची स्थिती पाहता कोकणाची वाट लागू शकते, असे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोकणाची जमीन ही त्यासाठी नाही. ते प्रकल्प दुसरीकडे हलवता येतात. कोकणची भूमी हे केरळसारखीच देवभूमी आहे. पर्यटनात केरळच पुढे जाऊ शकतो, मग आपलं कोकण का नाही? पण हा विचार करतच नाही. या गोष्टी करण्यासाठी राजकीय बळ लागते, असेही राज ठाकरे म्हणाले.

मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. कोकणातील जमिनीबाबत राज ठाकरे म्हणाले की, “ही भूमी आपली आहे. कोकणासारख्या पवित्र भूमीकडे आपले दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परप्रांतीय याठिकाणी घुसखोरी करत आहेत. आमचे लोक जमिनी विकून मोकळे होत आहेत. पण एकदा जमीन हातातून गेली की तुमचे अस्तित्व संपले. तुम्हाला कोणीही विचारणार नाही. आपल्याला आपल्या भूमीचे महत्त्व समजले पाहिजे. त्या जमिनीकडे तुम्हाला लक्ष द्यावच लागेल.

या भूमीने आतापर्यंत आपल्याला सर्व काही दिले आहे. देशातल्या अनेक राज्यांमधून भारतरत्न देतात. पा वा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी आणि जेआरडी टाटा या महाराष्ट्रातल्या आठ मान्यवरांना भारतरत्न मिळाला आहे. त्यापैकी एकट्या दापोली तालुक्‍यात चार भारतरत्न आहेत. या कोकणाने भारताला महान माणसे दिली आहेत आणि आम्ही फक्त गणपतीला गावाला जाऊन येतो. हे योग्य नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

रस्ते कंत्राटदारांना जाब विचारा
कोकणात नवीन रस्ते बांधले आहेत म्हणे. जेवढे नवीन रस्ते बांधले ते उखडले आहेत. गणपतीला गावाला जाताना तुमच्या मणक्‍यांना कळेलच ते. सरकार कोटयवधी रुपये खर्च करून रस्ते उभारत आहे.पण आपण कुठे रस्ते बांधतोय याचे त्यांना भान नाही. फक्त कमीशन घेवून निधीचा वाटप केला जात आहे. रस्ते बांधले जात आहे.

पाऊस पडला, दरडी कोसळल्या की आमचे रस्ते खराब, खड्डे पडायला सुरुवात. या रस्त्यांचे कंत्राटदार कोण आहे, याचा जाब तुम्ही आपल्या पद्धतीने विचारायला हवा. हजारो कोटी खर्च केले जातात ते काय कंत्राटदार आणि राजकारण्यांच्या घशात घालण्यासाठी? नुसते आकडे फेकले जात आहेत, पण कामे होत नाही, असे राज ठाकरे यांनी सुनावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)