मार्केट यार्डात 140 डझन आंब्याची आवक


घाऊक बाजारात किलोस 700 ते 1 हजार रुपये भाव


वर्षातून दोनदा पिक


रत्नागिरी येथील शेतकरी राजन भाटे यांच्या बागेतून आवक

 

पुणे- रत्नागिरी हापूस हंगाम संपल्यानंतर नागरिक ज्या रत्ना हापूसची आतुरतेने वाट पाहतात. तो आंबा मार्केट यार्डात दाखल झाला आहे. शेतकरी राजन भाटे यांच्या बागेतील हा आंबा फळबाजारातील व्यापारी अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर आला आहे. पुढील पंधरा दिवस या आंब्याची तुरळक आवक सुरू राहणार आहे. घाऊक बाजारात डझनास 700 ते 1 हजार रुपये भाव मिळत आहे.
दरवर्षी रत्नागिरी हापूसचा हंगाम साधारणपणे जून महिन्यात संपत असतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात रत्ना हा आंबा बाजारात येत असतो. साधारणपणे वर्षातून दोनदा या जातीच्या आंब्याचे पीक येते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रत्ना हापूसची आवक होते. त्यानंतर साधारणपणे तीन ते चार महिन्यांनी पुन्हा रत्ना हापूस आंबा तयार होतो. या जातीचा आंबा रत्नागिरी हापूसप्रमाणे आहे. गर केशरी असून चवीला गोड असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील विक्रेते अरविंद मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले, रत्ना हापूसचे फळ हापूस आंब्यापेक्षा थोडे मोठे असते. साधारणपणे तीनशे ते चारशे ग्रॅम एका फळाचे वजन असते. रत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकरी राजन भाटे यांनी रविवारी आमच्या गाळ्यावर 140 डझन आंबे विक्रीसाठी पाठविले. प्रतवारीनुसार एक डझन 700 ते 1000 रूपये भाव मिळाला. भाटे हे रत्नागिरीत पोलीस निरीक्षक आहेत. रविवारी विक्रीसाठी पाठविलेले 140 डझन आंब्यांना किरकोळ बाजारातील फळविक्रेत्यांकडून चांगली मागणी राहिली. सध्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असलेला आंबा परिपक्‍व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)