शिक्रापूर/रांजणगाव गणपती-कोंढापुरी (ता. शिरूर) येथे एका मोठ्या उद्योजकाने चार महिन्यांपूर्वी 25 जनावरांचा तसेच शेळ्यांचा गोठा बनविला. तेथे जनावरांच्या देखभालीसाठी एक कुटुंब ठेवले आणि मालक पुणे येथे गेला त्यानंतर चार महिने उलटून गेले तरी जनावरे पाहायला देखील आला नाही, जनावरांना चारा नाही तसेच कामगाराला पगार देखील नाही, चाऱ्या नसल्याने काही जनावरे देखील मेली. त्यामुळे मालक तुपाशी तर जनावरे उपाशी अशी वेळ आली आहे.
कोंढापुरी येथे पुणे येथील अतुल पाटील या उद्योजकाने पंचवीस कालवडी, गाई, म्हशी तसेच वीस शेळ्यांचा गोठा बनविला, येथील गोठ्यावर जनावरांच्या देखभालीसाठी श्रीगोंदा तालुक्‍यातील एक कुटुंब कामाला ठेवले व जनावरांना काही चारा घेऊन दिला. त्यानंतर चार महिने उलटूनदेखील मालक पाटील हे आजपर्यंत कोंढापुरी येथे आले नाहीत. आज रोजी जनावरांचा असलेला सर्व चारादेखील संपला तर कामाला ठेवलेल्या कुटुंबाला तीन महिन्यांपासून पगारदेखील दिला नाही. एक महिन्यापूर्वी जनावरांचा चारा संपल्यानंतर कामाला ठेवलेल्या कामगार प्रकाश मोरे यांनी शेजारील रानांमधून जनावरांना चारा आणून घातला त्यानंतर कोठेही चारा उपलब्ध होत नसल्यामुळे कामगारासह जनावरांना देखील उपासमारीची वेळ आली आहे. या आठवड्यामध्ये तीन गाई व शेळ्यांची दहा बारा करडे चाऱ्यावाचून मेली.
शनिवारी सकाळी विद्युत वितरण विभागाचे तंत्रज्ञ रामेश्वर ढाकणे हे बंद पडलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारा पाहण्यासाठी गेल्यानंतर वरील सर्व प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर ढाकणे यांनी वरील प्रकार शिक्रापूर पोलीस तसेच कोंढापुरी येथील काही युवकांना सांगितला. कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्यांना जनावरांची दया आली तेव्हा त्यांनी त्यांच्या शेतातील एक गाडी चारा आणून त्या जनावरांना टाकला. आणखी एक-दोन दिवसदेखील जनावरांना चारा पुरविणार असल्याचे स्वप्नील गायकवाड यांनी सांगितले. यावेळी पुणे वनविभागाचे सर्पमित्र गणेश टिळेकर, प्राणीमित्र रामेश्वर ढाकणे, अमोल गायकवाड, हर्षवर्धन घाडगे, नितीन काकडे, अभिजित गायकवाड यांसह आदी उपस्थित होते.
आम्ही जनावरांच्या शासकीय डॉक्‍टरांना फोन केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे स्वप्नील गायकवाड यांनी सांगितले. तर या मालकावर गुन्हा दाखल करून त्यावर जनावरांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी येथील नागरिकांनी केली आहे.

 • नियोजन आहे -पाटील
  याबाबत जनावरांचे मालक अतुल पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता आम्ही जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करत असून त्याबाबत आमच्या कामगाराला कळविले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 • जनावरांना चारा नसतानादेखील त्यांना डांबून ठेवून जनावरांचा छळ चालला आहे. एकीकडे जनावरांना चारा असून जनावरे नाहीत, तर येथे जनावरे आहेत; परंतु चारा नाही. या पाळलेल्या जनावरांची दोन-चार दिवसांची जबाबदारी आम्ही घेतली आहे. दोन दिवसात मालक येथे आला नाही तर आम्ही पुढाकार घेऊन गुन्हे दाखल करू.
  -स्वप्नील गायकवाड, माजी सरपंच कोंढापुरी
 • कोंढापुरी येथील जनावरांबाबत माहिती मिळाली असता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्यावेळी जनावरांचे मालक पाटील यांना फोनवर जनावरांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती; परंतु आता पाटील फोनला प्रतिसाद देत नाहीत.
  -दत्तात्रय होले, पोलीस हवालदार
 • जनावरांची दया म्हणून थांबलोय – मोरे
  कोंढापुरी येथे जनावरांच्या देखभालीसाठी कामावर ठेवलेले मोरे कुटुंब यांना तीन महिन्यांपासून पगार नसल्यामुळे घर चालविणे देखील जिकरीचे झाले आहे. एकीकडे जनावरांना चारा नाही. डोळ्यासमोर जनावरे मरू लागली. मात्र मालकाने आमचे आधार कार्ड त्याच्या ताब्यात घेऊन ठेवले आहेत; परंतु जनावरांची दया म्हणून आम्ही थांबलोय असे कामगार प्रकाश मोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)