कोंढव्यात राजकीय वरदहस्तामुळे फोफावताहेत झोपड्या

पायाभूत सुविधांवर येतोय ताण ः प्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे विकास खुंटला

महादेव जाधव

कोंढवा – कोंढवा-येवलेवाडी व वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दिवसेंदिवस सरकारी जागा बळकावून त्याठिकाणी अनधिकृतरीत्या झोपडपट्ट्या वसवण्याचे प्रमाण वाढत आहे. या झोपड्यांना राजकिय व स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदहस्त आहे. तर, पालिका प्रशासनाचा कोणताच अंकुश राहिलेला नाही. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच वाढत्या यांमुळे पायाभूत सुविधांवर ताण येत आहे, असे चित्र निदर्शनास येत आहे.

या झोपडपट्ट्यांमध्ये हजारो नागरिक राहतात. तर, अनेक ठिकाणी सरकारी, गायरान जागा, पालिकेच्या आरक्षित जागा व वनीकरणाच्या जागांवर अतिक्रमण करुन अघोषित झोपडपट्ट्या निर्णाम होत आहेत. कोंढवा बुद्रुक व कोंढवा खुर्द भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असून त्या उभ्या राहताना मतांचे राजकारण होते. या झोपड्यांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याने पालिकाप्रशासनही कारवाई करण्यास फारसे धजवत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने मुलभूत पायाभुत सुविधांवर अतिरिक्‍त ताण येत आहे.

झोपडपट्टी निर्माण झाल्यानंतर अनेक ठिकाणी पालिकेच्यावतीने नागरी सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. ज्याठिकाणी दिल्या गेल्या त्यांची देखभाल नागरिकांकडून योग्यरितीने घेतली न गेल्याने जनतेचा पैसा वाया जात आहे. अनधिकृत झोपडपट्टी केवळ गरजू लोकांनीच उभारल्या असे नाही तर, अनेक धनदांडग्यांनीसुद्धा झोपड्या बळकावून गरिबांना झोपड्या भाड्याने वा विकण्याचा धंदा जोमाने सुरू असल्याचे दिसत आहे.

मोकळ्या जागांवर भर दिवसा झोपड्या उभ्या राहतानाचे चित्र असले तरी, पालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या झोपड्या ज्यांच्या आशीर्वादामुळे उभ्या राहतात, त्यांचा विविध पद्धतीने दबाव या अधिकाऱ्यांवर असल्याने तेदेखील या झोपड्यांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये अनधिकृत नळकनेक्‍शन घेतलेले आहेत. अनेक ठिकाणी या नळाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. तर, दुसरीकडे पालिकेला नियमित कर, पाणीपट्टी भरुनही सर्वसामान्य नागरिकांना पुरेसे पाणी व सुविधा मिळत नाहीत.

अनेक झोपड्यांमध्ये राहणारे नागरिक धोकादायकरीत्या राहत आहेत. दुर्गंधीयुक्त परिस्थितीत राहिल्याने त्यांना आरोग्याचे विविध प्रश्‍न भेडसावत आहेत. कोंढवा बुद्रुक व कोंढवा खुर्द परिसरात एकीकडे गगनचुंबी इमारती उभ्या रहात आहेत. सुसज्ज सोसायट्या, टाऊनशिपमुळे येथील जागा व सदनिकांचे भाव गगनाला भिडले आहेत. लोकसंख्येची घनता झपाट्याने वाढत आहे. या जनतेला रस्ते, पाणी, आरोग्य यांसारख्या मुलभूत सुविधा देताना पालिकेला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सरकारी जागा बळकावल्या जाऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या या भागात विकासाचा दर मोठा आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, या विकासात भविष्यातील समस्या दडलेल्या आहेत.

यामुळे अनियंत्रित विकासाबरोबरच नियंत्रितरित्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम पालिकेने दुरदृष्टी ठेवून तातडीने हाती घेतले पाहीजे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने व उदासिन धोरणांमुळे स्वच्छता व सुनियोजित विकास होताना दिसत नाही.

कोंढव्याचे प्रभाग 41 व 27 हे दोन प्रभाग भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठे असल्याने नागरी सुविधा सोडविताना अपुरी कर्मचारी संख्या व यंत्रणाच नसल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. या भागातील कचरा नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे सर्वत्र कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. झोपडपट्ट्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. ओला व सुका कचरा वेगळा होत नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे पालिकेने योग्य नियोजन करुन पायाभुत सुविधा देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नव्याने झोपड्या उभ्या राहू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)