कॉसमॉस बॅंक : सायबर दरोडाप्रकरणी आणखी दोघे गजाआड

पुणे, दि. 13 – कॉसमॉस बॅंकेवर सायबर हल्ला करून तब्बल 94 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात आणखी
दोघांना सायबर क्राइम सेलने औरंगाबाद आणि नांदेड येथून अटक केली. त्यांना दि.18 सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी दिला आहे.

शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय 28, रा. मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय 22, रा. धावरीतांडा, नांदेड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी फहिम मेहफूज शेख (वय 27, रा. नुरानी कॉम्पलेक्‍स, भिवंडी) आणि फहिम अझिम खान (वय 30, रा. सिमा हॉस्पिटलमागे, आझादनगर औरंगाबाद) यांना अटक झाली आहे. ते दोघे पोलीस कोठडीत आहेत. तर आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुहास गोखले (वय 53, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कॉसमॉस बॅंकेवर सायबर हल्ला करून 94 कोटी 42 लाख रुपये लुटल्याची घटना 11 ते 13 ऑगस्टदरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रांतून काढण्यात आली आहेत. यात 413 बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून 2 हजार 849 व्यवहार करण्यात आले आहेत. तर, 12 हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून 78 कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून 13 कोटी 92 लाख रुपये बॅंकेतून गेले आहेत.
मुंबई, इंदौर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली. मोबाइलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरुन ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीवरुन यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे केलेल्या पोलीस तपासात नावे निष्पन्न झाल्याने जब्बार आणि राठोड या दोघांना अटक करण्यात आली आहे. “या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3 लाख 55 हजार रुपये जप्त केले आहेत. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. अटक आरोपींनी कट करून हा गुन्हा केला आहे. बॅंकेचे सर्व्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने वेगवेगळ्या भागातून सर्वजण आरोपी कोल्हापूर येथे आले होते. त्यांनी बनावट 95 (क्‍लोन) एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले आहे. जब्बार आणि रोठोड यांनी किती रक्कम काढली. याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, आंतरराष्ट्रीय टोळी असण्याची शक्‍यता आहे. फरार साथीदार आणि मास्टर माइंडच्या शोधासाठी, त्यानी बनावट कार्ड कोठे बनविली, त्याचे साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बॅंकेचा डाटा कसा मिळविला, याचा शोध घेण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी द्यावी,’ अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)