कॉसमॉस सायबर हल्ल्याचा छडा

बिवंडी, औरंगाबाद येथून दोघांना अटक : न्यायालयाने सुनावली सात दिवस पोलीस कोठडी

पुणे- कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात चतृ:श्रृंगी पोलिसांनी भिवंडी आणि औरंगाबाद येथून दोघांना अटक केली आहे. त्या दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.भळगट यांनी सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या दोघांनी बनावट (क्‍लोन) डेबिटकार्डद्वारे कोल्हापुर येथील विविध एटीएम केंद्रातून 89 लाख 47 हजार 500 रुपयांचे काढल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

फहिम मेहफूज शेख (वय 27, रा. नुरानी कॉम्पलेक्‍स, भिवंडी), फहिम अझीम खान (वय 30, रा. सिमा हॉस्पिटलच्या मागे, आझादनगर औरंगाबाद) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी सुहास सुभाष गोखले (वय 53, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

कॉसमॉस बॅंकेवर सायबर हल्ला करुन तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये लुटून नेले होते. ही घटना 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान झाली होती. यातील अडीच कोटी रुपयांची रक्कम भारतातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली आहेत. यात 413 बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून 2 हजार 800 व्यवहार करण्यात आले आहेत. तर, 12 हजार व्यवहार व्हीसा कार्डद्वारे झाले असून, त्यातून 78 कोटी आणि स्विफ्ट व्यवहारातून 13 कोटी 92 लाख रुपये बॅंकेतून गेले आहेत.

मुंबई, इंदौर, कोल्हापूर या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली. मोबाईलची माहिती आणि आरोपींच्या फोटोंवरुन ते भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माहितीवरुन केलेल्या तपासात अटक केलेल्या आरोपींनी पाच साथीदारांच्या मदतीने काढल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित ओरपींनी कोल्हापूरमधून पैसे काढण्यासाठी 95 बनावट डेबिट कार्डचा वापर केला आहे. बनावट कार्ड कोठे तयार केली, त्यांना त्याचे साहित्य कोणी पुरविले, आरोपींनी कॉसमॉस बॅंकेचा डाटा कसा मिळविला, बॅंकेचे सर्व्हर हॅक होणार याची माहिती कशी मिळाली, संबंधित गुन्हा आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा असल्याने याचा शोध घेण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस.ए.क्षीरसागर यांनी केली.

11 ऑगस्ट रोजी 95 बनावट कार्डद्वारा काढले पैसे
अटक केलेल्या दोघा आरोपींनी पाच साथीदारांसह 11 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 3 ते रात्री दहा या वेळेत बनावट डेबिटकार्डद्वारे 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचे निष्पन्न झाले आहे. कोल्हापूरातील एयु स्मॉल फायनान्स, सारस्वत बॅंक, एसव्हीसीएल, कॉर्पोरेशन, द कमर्शिअल को ऑपरेटीव्ह, एचडीएफसी, ऍक्‍सीस, एसबीआय, युनियन बॅंक, पंजाब, महाराष्ट्र बॅंक, राजाराम बापू सहकारी या बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी तब्बल 95 बनावट डेबिट कार्ड वापरण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)