कॉर्न अर्थात ठसठसणारे कुरुप

पायाला कुरुप झाले म्हणजे त्याचा किती त्रास होतो हे कुरुप झाल्या शिवाय समजत नाही.बहुतेकांना कधी ना कधी तरी कुरुप होतेच.कुरुप होण्याचे सर्वात सोपे कारण म्हणजे आपले उभे राहणे. आपल्या उभे राहण्यामुळे दोन्ही पायांना शरीराचे वजन सांभाळावे लागते.तुमचे वजन साठ किलो असेल तर प्रत्येक पायाला तीस किलो वजन तोलून धरावे लागते.वजन जास्त असेल तर जास्त तोलून धरावे लागते. पण तीस किलो म्हणजे काही कमी नाही. हाच भार कोणत्याही कारणाने तळपायावर अनियमीतपणे पडत असेल तर तळपायाच्या ज्या भागावर जास्त पडत असेल त्या भागाला इतर भागापेक्षा जास्त वजन तोलून धरावे लागते.

त्वचेवर कोणत्याही प्रकारचा दाब किंवा दडपण असेल तर त्वचा हळूहळू जाड व्हायला लागते.हे जाड होणे म्हणजे तिथल्या भागात केराटीन नावाच्या प्रथिनाची निर्मिती जास्त प्रमाणात होते. शरीराचे वजन सहन करण्यासाठी ही त्वचा जाड होते.ती एक त्वचेची प्रतिक्रिया असते. ही जाड झालेली त्वचा सारख्याप्रमाणात पसरलेली असेल तर त्याला घट्टे पडणे किंवा कॅलस असे म्हणतात.

हीच जाड त्वचा अगदी गाठीच्या स्वरुपात मर्यादीत भागातच असेल तर तिला कुरुप असे म्हणतात
कुरुप होण्याची कारणे
बूट किंवा चप्पल घट्ट असणे
बुटाचे किंवा चप्पलचे खिळे तळपायाला टोचणे
पादत्राणाचा तळ समपातळीवर नसेल तर
चालण्याची पध्दत अयोग्य असेल तर
पायाचे एखादे हाड वाढले असेल तर
पायामध्ये व्यंग असेल तर

सुतारकामासारख्या कामात पाय सतत एकाच ठिकाणा घासत असेल तर
कुरुप नेहमी त्वचेच्या सर्वात वरच्या थराने सुरु होते. केराटीनचे थर वाढायला लागले की आधीचा थर त्वचेमध्ये खोलवर घुसतो.त्वचेच्या सर्वात वरचा थर जरा पसरट असतो,पण आत घुसलेले टोक टोकदार असते. कुरुप एखाद्या कोनासारखे दिसते.आत घुसलेले त्वचेच्या थराचे टोक चालताना त्यावर दाब पडल्याने दुखायला लागते. या वेदना अतिशय असह्य असतात.त्यामानाने घट्टा पडलेली जागा इतकी दुखत नाही. सहन करण्यासारखी असते.

अनुवंशिकता
काहीजणांना वारंवार आणि बऱ्याच संख्येने कुरुप होतात. पायाच्या योग्य मापाचे बूट किंवा चप्पल घऊनसुध्दा कुरुप व्हायचे ते होतातच. असे प्रमाण फार क्वचितच असते. अनुवंशिकता हे त्याचे महत्वाचे कारण असते.
घट्टा किंवा कुरुप सुरवातीला काहीच त्रास देत नाही. पण नंतर चालताना दुखायला लागते.तुमच्या चालण्याची ढब बदलते.चपला किंवा बूट अनियमितपणे घासले जातात. कधीकधी कुरुपामध्ये बॅक्‍टेरीयाचे इन्फेक्‍शन झाले तर पू होतो आणि वेदना जास्त होतात. तापही येतो.

उपचार
कुरुप आणि कॅलसवर दोन प्रकारे उपचार करावे लागतात.एककुरुप काढून टाकणे आणि दोन कुरुप पुन्हा होऊ नये याची काळजी घेणे. कुरुप काढण्यासाठी फार सावधगीरी बाळगावी लागते. हे काम डॉक्‍टरांनाच करु द्यावे.केराटीनचे थर धारदार चाकूने हलकेच खरवडून काढावे लागतात. वरचे थर काढले की कुरुप खूप लहान दिसायला लागते. आणि कधीकधी त्वचेखालचे कुरुपाचे टोकसुध्दा निघून जाते. घरी ब्लेडने काहीजण कुरुपाचा वर वारंवार खरवडून काढतात. कधीकधी ब्लेड लागते.रक्‍त येते.मग धनुंर्वाताचे इंजेक्‍शन घ्यावे लागते.त्यापेक्षा हे काम डॉक्‍टरांनाच करु द्यावे. कुरुपाचे त्वचेखालचे टोक खूपच आतमध्ये असेल तर मात्र तेवढी जागा बधीर करुन कुरुप मूळासकट काढावे लागते.हे लहानसे ऑपरेशनच असते. ते हॉस्पिटलमध्ये करावे लागते. जखम मोठी व खोल असल्यामुळे रोज ड्रेसिंगही करावे लागते. काही दिवसातच जखम भरुन निघते.

मलम आणि कॉर्न कॅप
सॅलिसिलीक अॅसिडचे मलम लावले तर केराटीनचे थर निघून जातात. याच मलमाने घट्टेसुध्दा मऊ पडतात.

कॉर्नकॅप लावण्याची पध्दत
कॉर्नकॅप म्हणजे एक गोल चिकटपट्टी असते. मधोमध एक रिंग असते. वर्तुळाच्या केंद्रामध्ये 40टक्‍के सॅलिसिलीक अॅसिड असते.वरचं कव्हर काढून चिकटपट्टी कुरुपावर नीट बसवावी. दोनतीन दिवसातच कुरुप मऊ पडते. पट्टी ओढून काढताच कुरुप मूळासकट बाहेर निघते.कधीकधी एका पट्टीने कुरुप निघत नाही.दुसरी लावावी लागते. कॉर्नकॅपमध्ये सॅलिसिलीक अॅसिड असते. आणि ते तीव्र स्वरुपाचे असते. कॅप जर नीट लावली नाही तर निरोगी त्वचा जळून जाण्याची शक्‍यता असते. म्हणून कॅप बरोबर कुरुपावर बसेल अशीच लावावी. किंवा मग कुरुपावर आधी कापसाचा एक पातळथर ठेवावा नंतर कॅप लावावी. निरोगी त्वचेला संरक्षण मिळते.

हाय हिल्स आणि कुरुप
स्त्रियांमध्ये टाचांना घट्टे पडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे उंच टाचेची पादत्राणे. खूप उंच टाचांची पादत्राणे घालू नये. टाचा मध्यम उंचीच्या असाव्या. टाचांना घट्टे आधीपासूनच असतील तर उंच टाचांची पादत्राणे घालूच नयेत. सपाट तळ असलेले कोणतेही पादत्राण घालावे

– डॉ. जयंत पाटील 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)