कॉपी… कॉपी

दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचेही टेन्शन आता कमी झाले असेल. पण थोडेसेच. कारण अभ्यासाचे परीक्षेचे टेन्शन कमी झाले तरी रिझल्टचे टेन्शन असणारच. किती टक्‍के मार्क मिळणार याची उत्सुकता आणि टेन्शन असल्यामुळे आता विद्यार्थी आणि त्यांचे पालकही रिझल्टकडे चातकासारखी नजर लावून असतील. कारण त्यावर बरेच काही अवलंबून असते. संपूर्ण करियर! किती टक्‍के मार्क मिळतात, त्यावर कोणत्या साईडला प्रवेश मिळणार हे अवलंबून असते. दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे.

सर्वच क्षेत्रातील आणि शिक्षणक्षेत्रातील तर फारच. आता नुसता फर्स्ट क्‍लास, डिस्टिंक्‍शन मिळून चालत नाही. 80-90 टक्‍के मार्क म्हणजे काहीच नाही. निकाल पाहिला तर 97-98 टक्‍के मार्क्‍स मिळालेले विद्यार्थी दिसतात आणि एवढे मिळूनही हवा तेथे प्रवेश मिळेलच याची खात्री नसते. उलट एक वर्ग असाही असतो की नुसते पास झालो, परीक्षेतून सुटलो, वर्ष वाचले तरी पुरे अशी त्यांची भावना असते. परीक्षेसाठी वर्षभर नियमितपणे अभ्यास करणे ही आवश्‍यक गोष्ट आहे. पण काही मात्र अभ्यास दुय्यम समजतात. कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याकडे बिहार राज्य तर परीक्षेतील कॉपीच्या बाबतीत फारच बदनाम आहे. नुसती कॉपी नाही, “मास कॉपी’. अलीकडच्या चार-दोन वर्षांत त्यावर नियंत्रण आणण्याचा यशस्वी प्रयत्न चालू आहे, पण तरीही कॉपी हा प्रकार पूर्णपणे थांबलेला नाही. त्यातला राजरोसपणा मात्र ओहोटीला लागला आहे. तरीहे वृत्तपत्रात त्याबाबत बातम्या येत असतातच. मध्यंतरी कॉपी करण्यास मदत करणाऱ्या 100 पालकांना अटक करण्यात आल्याची बातमी वाचली होती. आणि कॉपीवर कडक नियंत्रण आणायला सुरुवात केल्यापासून एकूण निकालाची टक्‍केवारीही लक्षणीय कमी झालेली आहे. मागे 12 च्या परीक्षेतील टॉपर विद्यार्थिनी रुबी रॉयने पॉलिटिकल सायन्समध्ये पाकशास्त्राचा अभ्यास असल्याचे काही विधान टीव्ही कार्यक्रमात प्रसारित झाले होते. नंतर पुन्हा घेतलेल्या परीक्षेत तिला एकाही प्रश्‍नचे उत्तर देता आले नव्हते. याप्रकरणी त्या मुलीचे वडील आणि शिक्षण संस्थेच्या मालकासह 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर कॉपी प्रकरणांवर नियंत्रण येऊ लागले.

कॉपी करणे हा प्रकार थोड्याफार प्रमाणात सर्वत्र चालतो. सर्वच क्षेत्रात कॉपी चालते. एखाद्याने एखादा व्यवसाय सुरू केला, की तोच व्यवसाय करायला अनेक जण सरसावतात. कोणी, विशेषत: चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नटनट्यांनी किंवा खेळाडूंनी एखादी फॅशन केली, की तिची कॉपी युवा पिढी अगदी आंधळेपणाने करते. मग ती कपड्याची असो वा आणखी कसली. मागे कोणत्या गझनी चित्रपटातील आमीरखानची ती डोक्‍याचे ऑपरेशन केल्यानंतरची अत्यंत चमत्कारिक दिसणारी हेअरस्टाईलही कितीतरी तरुणांनी केली होती. त्यांना ती का आवडली हेच कळले नाही. अर्थात ती फार काळ टिकली नाही.

आता तर दाढीचे फॅड आले आहे. आपल्या भारतीय क्रिकेट टीममध्ये तर बिनदाढीचा खेळाडू शोधूनही सापडणार नाही. मागे देवीचा रोगी कळवा एक लाख रुपये मिळवा अशी काहीतरी जाहिरात यायची ना, तशी बिनदाढीचा खेळाडू कळवा एक लाख रुपये मिळवा अशी जाहिरात देण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक आहे, या साऱ्या दाढ्या सुबकपणे कोरलेल्या असतात. अर्थात ते कामही मोठे खर्चिक असते. दाढी वाढवण्यापेक्षा दाढी कोरायला जास्त खर्च येतो म्हणे. अर्थात हे विषयांतर झाले. विषय होता परीक्षेतील कॉपीचा. कॉपी करण्यावर नियंत्रण ठेवण्याचेही कसोशीने प्रयत्न केले जातात. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 10 च्या परीक्षेसाठी बिहारमध्येच परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कसोशीने तपासणी केल्याचे आणि त्यांना बुट-सॉक्‍स घालून परीक्षा हॉलमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आल्याचेही वाचले होते. या परीक्षेसाठी 1200 केंद्रांवर सुमारे 17 लाख विद्यार्थी बसले होते. हे सारे आठवण्यचे आणि कॉपीरामायण सांगण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी नेटवरील बातम्यांत कोठेतरी पाहिलेला एक फोटो. बॅंकॉकमधील एका विद्यापीठाच्य परीक्षेच्या वेळचा फोटो होता तो. अत्यंत लक्षवेधक. तो पाहूनच कॉपीबद्दल काहीतरी लिहावेसे वाटले. टांग्याच्या घोड्याला त्याने इकडे तिकडे बघू नये म्हणून डोळ्यांना ढापणे लावतात ना, तसे या विद्यार्थ्यांच्या डोक्‍यावर त्यांना इकडचे तिकडचे दिसू नये म्हणून कॉपीनिरोधक हेल्मेट (अँटी कॉपी हेल्मेट) हेल्मेट घालणे सक्‍तीचे केले होते. असा प्रयोग आपल्याकडेही करायला हरकत नाही.

अश्‍विनी महामुनी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)