कॉग्निझंट, मर्क्‍स संघांचा उपान्त्य फेरीत प्रवेश

आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धा

पुणे – कॉग्निझंट आणि मर्क्‍स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पृथ्वी एडिफाईस करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेचे आयोजन व्हाईट कॉपरतर्फे करण्यात आले आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या सामन्यात प्रथमेश देशपांडे याने केलेल्या नाबाद 63 धावांच्या जोरावर कॉग्निझंट संघाने ऍमडॉक्‍स संघाचा 8 गडी राखून सहज पराभव केला. ऍमडॉक्‍स संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 126 धावा केल्या. यामध्ये आवेश सय्यद (40 धावा) आणि शैलेंद्र बाकरे (नाबाद 30) यांनी ऍमडॉक्‍स संघाला सव्वाशेचा टप्पा गाठून दिला.

कॉग्निझंट संघाने 14.2 षटकांत 2 गडी गमावून 129 धावा फटकावताना विजयाचे आव्हान पूर्ण केले. यामध्ये प्रथमेश देशपांडे याने नाबाद 63 धावा केल्या. त्याच्यासह करण केसरकर (26) व प्रीतम साहू (22) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. करण आणि प्रथमेश यांनी कॉग्निझंटला 45 चेंडूंत 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर प्रथमेश याने दुसऱ्या गड्यासाठी प्रीतम यांच्या साथीत 26 चेंडूंत 51 धावा जोडून कॉग्निझंटला सहज विजय मिळवून दिला.

दुसऱ्या सामन्यात कर्णधार वेंकटेश अय्यरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मर्क्‍स संघाने पीटीसी सॉफ्टवेअर संघाचा 102 धावांनी पराभव करून उपान्त्य फेरी गाठली. मर्क्‍स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 178 धावा केल्या. प्रसाद गिरकर (44 धावा), राघव त्रिवेदी (31), तुषार देशपांडे (27) व वेंकटेश अय्यर (20) यांनी मर्क्‍स संघाला पावणे दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. त्यानंतर वेंकटेश अय्यर (25-4) व अभिषेक राय (14-2) यांच्या माऱ्यासमोर पीटीसी संघाचा डाव 14.4 षटकांत सर्वबाद 76 धावांवर संपुष्टात आला.

सविस्तर निकाल –

उपान्त्यपूर्व फेरी – 1) ऍमडॉक्‍स- 20 षटकांत 8 गडी बाद 126 धावा (आवेश सय्यद 40 (31, 5 चौकार, 1 षटकार), शैलेंद्र बाकरे नाबाद 30 (23, 3 चौकार, 1 षटकार), पुनित करण 2-21, राकेश सिंग 2-24) पराभूत वि. कॉग्निझंट- 14.2 षटकांत 2 गडी बाद 129 धावा (प्रथमेश देशपांडे नाबाद 63 (45, 7 चौकार, 2 षटकार), करण केसरकर 26, प्रीतम साहू 22); (भागीदारी- पहिल्या गड्यासाठी करण आणि प्रथमेश यांच्यात 60 (45); दुसऱ्या गड्यासाठी प्रथमेश आणि प्रीतम यांच्यात 51 (26); सामनावीर- प्रथमेश देशपांडे;

2) मर्क्‍स- 20 षटकांत 9 गडी बाद 178 धावा (प्रसाद गिरकर 44 (32, 1 चौकार, 4 षटकार), राघव त्रिवेदी 31 (21, 7 चौकार), तुषार देशपांडे 27, वेंकटेश अय्यर 20, अनिल गिरकर 4-29) वि.वि. पीटीसी सॉफ्टवेअर- 14.4 षटकांत सर्वबाद 76 धावा (मंगेश देशपांडे 24 (17, 5 चौकार), वेंकटेश अय्यर 4-25, अभिषेक राय 2-14); सामनावीर- वेंकटेश अय्यर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)